नवी दिल्ली : स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना सावध करणारी सूचना दिली आहे. आपल्या बॅंक खात्याची माहिती इतरांना देण्यापासून सावध राहण्यास स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे. स्टेट बॅंकेचे कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याची सूचना बॅंकेने आपल्या खातेधारकांना केली आहे. खातेधारकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी स्टेट बॅंकेकडून नियमितपणे ग्राहकांना धोक्याच्या सूचना दिल्या जातात.
काही सायबर गुन्हेगार बॅंकेच्या ग्राहकांच्या खात्यात ऑनलाईन स्वरुपात फिक्स्ड डिपॉझिट बनवत आहेत, अशी माहिती स्टेट बॅंकेला मिळाली आहे. या सायबर गुन्हेगारांचा हेतू सोशल इंजिनियरिंग फ्रॉड करणे हा आहे. यामुळेच ग्राहकांनी केवळ आपल्या बॅंक खात्यालाच लॉग इन करावे अशी सूचना स्टेट बॅंकेने आपल्या खातेधारकांना दिली आहे.
याशिवाय आपला पासवर्ड, ओटीपी, सीव्हीव्ही नंबर आणि याच प्रकारची कोणतीही माहिती कोणालाही देऊ नये. आम्ही आमच्या ग्राहकांकडून कधीही फोन, ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून कोणतीही माहिती मागत नाही, असे स्टेट बॅंकेकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारची माहिती स्टेट बॅंकेद्वारे संवेदनशील माहितीच्या स्वरुपात राखली जाते.
मागील काही दिवसात सायबर गुन्हेगारांनी फिशिंगच्या माध्यमातून स्टेट बॅंकेच्या खातेधारकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यासंदर्भात देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने आपल्या खातेधारकांना सावध करणाऱ्या सूचना दिल्या होत्या.
यासंदर्भात ट्विट करत स्टेट बॅंकेने, सायबर गुन्हेगार खोटे मेसेज किंवा बनावट ई-मेलच्या माध्यमातून फिशिंग लिंक पाठवून बॅंकेच्या खातेधारकांना टार्गेट करत असल्याची माहिती दिली होती.
हे गुन्हेगार बॅंकेच्या खातेधारकांना इन्कम टॅक्स रिफंड करण्याचे आमीष दाखवत आहेत. याचा वापर करत ग्राहकांची गोपनीय माहिती मिळवून त्यांची फसवणूक करण्यात येते आहे.
खातेधारकांनी आपला कार्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, पासवर्ड यासारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. ईमेल किंवा एसएमएस द्वारे मिळालेल्या कोणत्याही अनावश्यक अटॅचमेंटवर क्लिक करू नये, अशी अपील स्टेट बॅंकेने आपल्या खातेधारकांना केली आहे.
स्टेट बॅंकेने ग्राहकांना सावध करण्यासाठी ट्विटसुद्धा केले आहे. त्यात बॅंक ग्राहकांकडून कोणतीही माहिती मागत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
१. कोणाही व्यक्तीला आपली बॅंकेशी निगडीत माहिती देऊ नका. विशेषत: अनोळखी व्यक्तीला अजिबात माहिती देऊ नका.
२. वेळोवेळी आपल्या बॅंक खात्याचा पासवर्ड बदलत राहा.
३. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोन, ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून इंटरनेट बॅंकिंगची माहिती देऊ नका.
४. संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका.
५. बॅंकेशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी नेहमी बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवरच जा.
६. तुमची फसवणूक झाल्यास ताबडतोब जवळच्या स्टेट बॅंकेच्या शाखेला आणि पोलिसांना ही माहिती द्या.