एसबीआयची व्याजदरात कपात, ‘ही’ कर्जे होणार स्वस्त

काम-धंदा
Updated Feb 07, 2020 | 13:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवल्यानंतरही भारतीय स्टेट बॅंकेने व्याजदरात ०.०५ टक्क्याची कपात केली आहे. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्के झाला आहे.

SBI cut MCLR rate
एसबीआयची व्याजदरात कपात, ‘ही’ कर्जे होणार स्वस्त  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवल्यानंतरही भारतीय स्टेट बॅंकेने व्याजदरात ०.०५ टक्क्याची कपात केली आहे.
  • एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्के झाला आहे.
  • चालू आर्थिक वर्षात बॅंकेने सलग नवव्यांदा एमसीएलआर दरात कपात केली आहे.

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवल्यानंतरही भारतीय स्टेट बॅंकेने व्याजदरात ०.०५ टक्क्याची कपात केली आहे. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्के झाला आहे. तसेच बॅंकेने मुदत ठेवींच्या दरात ०.१० टक्के ते ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेने सलग नवव्यांदा एमसीएलआर दरात कपात केली आहे. बदल करण्यात आलेले नवे व्याजदर येत्या १० फेब्रुवारीपासून लागू होतील असे बॅंकेने सादर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एसबीआयने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर ०.०५ टक्क्याने कमी केला आहे. एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ७.९० टक्क्यावरून ७.८५ टक्के झाला आहे. यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होणार आहेत. कालच्या पतधोरणानंतर एसबीआयने पहिल्यांदा व्याजदरात बदल केला. बॅंकिंग व्यवस्थेत रोकड सुलभता वाढल्याने ठेवी दरात कपात केली आहे. बॅंकेने मुदत ठेवींच्या दरात कपात केली आहे. बॅंकेने मुदत ठेवींच्या दरात ०.१० टक्के ते ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. ३१ डिसेंबर अखेर बॅंकेकडे ३१ लाख कोटींच्या ठेवी आहेत.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बॅंकांनी ग्राहकांना द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागील दोन पतधोरण वगळता त्यापूर्वीच्या सलग पाच पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर कमी केला होता. मात्र, बॅंकांकडून पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

रिझर्व्ह बॅंकेने गुरूवारी पतधोरण आढाव्यात कोणत्याही दरांमध्ये बदल केला नाही. त्यामुळे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे ५.१५ आणि ४.९० टक्के ठेवण्यात आला आहे. बॅंक दरही पूर्वीइतकाच ५.४० टक्के इतका ठेवण्यात आला आहे.

मुदत ठेवींचे दर पुढीलप्रमाणे असतील-

१८० दिवस ते २१० दिवस – ५.५० टक्के

२११ दिवस ते १ वर्षाहून कमी – ५.५० टक्के

१ वर्ष ते २ वर्ष – ६ टक्के

२ वर्ष ते ३ वर्ष – ६ टक्के

३ वर्ष ते ५ वर्ष – ६ टक्के

५ वर्ष ते १० वर्ष – ६ टक्के

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी