स्टेट बॅंकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात, जाणून घ्या नवे व्याजदर

काम-धंदा
Updated May 02, 2021 | 14:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने शनिवारी गृहकर्जावरील व्याजदरातील कपातीची घोषणा केली. आता ग्राहकांना ६.७ टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे. ३० लाख रुपयांपर्यतच्या गृहकर्जासाठी ६.७ टक्के व्याजदर असणार आहे

SBI reduces interest rates on home loan
स्टेट बॅंकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात 

थोडं पण कामाचं

  • स्टेट बॅंकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात
  • व्याजदर ६.७ टक्क्यांवर
  • महिलांना अतिरिक्त सवलत

नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने शनिवारी गृहकर्जावरील व्याजदरातील कपातीची घोषणा केली. आता ग्राहकांना ६.७ टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे. ३० लाख रुपयांपर्यतच्या गृहकर्जासाठी ६.७ टक्के व्याजदर असणार आहे. तर ३० लाख रुपये ते ७५ लाख रुपयांपर्यतच्या गृहकर्जासाठी ६.९५ टक्के वार्षिक व्याजदर असणार आहे. जे ग्राहक ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त गृहकर्ज घेतील त्यांना ७.०५ टक्के व्याजदर लागू होणार असल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे. नवे व्याजदर १ मे पासून लागू होणार आहेत.

महिलांसाठी विशेष सवलत

महिलांसाठी स्टेट बॅंकेने विशेष सवलत दिली आहे. महिलांना गृहकर्जावर ५ बीपीएसची सवलत दिली जाणार आहे. जे ग्राहक योनो अॅपद्वारे गृहकर्जासाठी अर्ज करतील त्यांना अतिरिक्त ५ बीपीएसची सवलत मिळणार आहे. ग्राहकांना सुलभ व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅंकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

रियल इस्टेटला चालना

'स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही गृह वित्तीय सेवेतील देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. गृहकर्जासाठी ग्राहकांना अधिक सुलभ व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. नव्या व्याजदरांमुळे ग्राहकांना गृहकर्ज घेणे आणखी सोपे होणार असून घर विकत घेणे ही त्यांच्या आवाक्यातील बाब असणार आहे. यामुळे ईएमआयची रक्कमदेखील कमी होणार आहे,'असे मत स्टेट बॅंकेच्या रिटेल आणि डिजिटल बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी एस शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. रियल इस्टेट क्षेत्रालादेखील यामुळे चालना मिळेल याची मला खात्री आहे, असेही ते पुढे म्हणाले. 

घर घेणे झाले सोपे

'स्टेट बॅंकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केल्यानंतर गृहकर्ज आतापर्यतच्या सर्वात स्वस्त व्याजदरात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर विकत घेण्यास प्रोत्साहन मिळेल. विशेषत: जे ग्राहक व्याजदराविषयी चिंतित होते ते आता निर्णय घेऊ शकतील आणि त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करू शकतील,' असे मत हाऊसिंग डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाल यांनी व्यक्त केले आहे.

एप्रिल महिन्यात स्टेट बॅंकेने त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात बदल केले होते. बॅंकेने व्याजदर ६.९५ टक्क्यांवर आणले होते. बॅंकेच्या गृहकर्जाचा व्यवसायाने ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गृहकर्जाच्या व्यवसायात बॅंक देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गृहकर्जाच्या व्यवसायात स्टेट बॅंकेचा बाजारातील हिस्सा ३४ टक्के आहे. 
 

इतर बॅंका करतात एसबीआयचे अनुकरण

स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. बॅंकिंग क्षेत्रातील अनेक बाबींचे ट्रेंडदेखील स्टेट बॅंकेनेच सुरू केले आहेत. अनेक बॅंका त्यानंतर स्टेट बॅंकेचे अनुकरण करतात. आगामी दिवसांमध्ये अनेक गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था आणि इतर बॅंकादेखील स्टेट बॅंकेचेच अनुकरण करतील अशी चिन्हे आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्याच्या केंद्र सरकारच्या आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या धोरणालाच अनुसरून हे असणार आहे, असे मत पुढे अगरवाल यांनी व्यक्त केले. रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार अनेक पावले उचलते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी