मुंबई: भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ऑनलाइन बँकिंग सेवा अचानक ठप्प झाली आहे. बँकेने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, असं असलं तरीही एटीएम आणि पीओएस मशीनवर काहीही परिणाम झालेला नाही. देशातील सर्वात मोठ्या बँकेने याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना सांगितलं की, 'कनेक्टिव्हिटीमुळे आज आमच्या मुख्य ग्राहकांना (13.10.20) मुख्य बँकिंग प्रणाली उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. एटीएम आणि पीओएस मशीन वगळता सर्व चॅनेल प्रभावित आहेत.'
एसबीआयने ट्विट केले आहे की, 'सध्या बँकेचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून फक्त एटीएम आणि पीओएस मशीन सुरू असल्याचे सांगितले आहे. तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू असून ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे. आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबर राहण्याची विनंती करतो. लवकरच सामान्य सेवा पुन्हा सुरू होईल.' एसबीआयच्या ग्लिचबाबत त्यांच्या अनेक ग्राहकांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. YONO अॅप यूजर्स देखील आपल्या खात्यात प्रवेश करु शकत नाही.
मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक व कर्मचार्यांच्या बाबतीत एसबीआय ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. ही देशातील सर्वात मोठे तारण कर्ज देणारा देखील बँक आहे. 30 जून, 2020 पर्यंत बँकेकडे ३४ लाख कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत आणि CASA प्रमाण 45% पेक्षा जास्त आहे आणि सुमारे 24 लाख कोटी रुपयांची आगाऊ रक्कम आहे.
एसबीआयकडे भारतातील 22,100 पेक्षा जास्त शाखांचे जाळे आहे ज्यामध्ये एटीएम / सीडीएम नेटवर्क 58,500 हून अधिक आहे आणि एकूण आउटलेट 62,200 हून अधिक आहेत. इंटरनेट बँकिंग सुविधा वापरणार्या ग्राहकांची संख्या सुमारे ७६ दशलक्ष आहे आणि मोबाइल बँकिंग सेवा १७ दशलक्षाहून अधिक लोक वापरतात.
एसबीआयची ऑनलाइन सेवा बंद झाल्याने ग्राहक कोणालाही मोबाइल अॅप किंवा मनी टान्सफरिंग अॅपद्वारे पैसे पाठवू शकत नाही. कोट्यवधी ग्राहक हे एसबीआय ऑनलाइन बँकिंगचा वापर करतात. त्यामुळे अचानकपणे ऑनलाइन सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.