अंबानी बंधूंना सेबीचा दणका , २० वर्ष जुन्या प्रकरणात २५ कोटींचा दंड

काम-धंदा
Updated Apr 08, 2021 | 16:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

जवळपास २० वर्ष जुन्या प्रकरणात सेबीने मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यावर कारवाई केली आहे. सेबीने अंबानी बंधूंना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

SEBI orders Rs 25 crore fine to Ambani brothers
अंबानी बंधूंना सेबीचा २५ कोटींचा दंड 

थोडं पण कामाचं

  • सेबीची मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यावर कारवाई
  • अंबानी बंधूंना २५ कोटी रुपयांचा दंड
  • २००० मध्ये रिलायन्सचे ६.८३ टक्के शेअर विकत घेण्यासंदर्भातील प्रकरण

मुंबई : शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीने (सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) बुधवारी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दोन दशक जुन्या प्रकरणात २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अंबानी बंधूंव्यतिरिक्त इतरही काही व्यक्तींचा यात समावेश आहे. हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित असून २००० मधील आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने अधिग्रहण नियमांचे पालन न केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. ज्या व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला आहे त्यात अंबानी बंधूंव्यतिरिक्त नीता अंबानी, टीना अंबानी, के डी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. नीता अंबानी या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत, तर टीना अंबानी या अनिल अंबानी यांच्या पत्नी आहेत. 

सेबीचा आदेश


सेबीने आपल्या ८५ पानांच्या आदेशात म्हटले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या व्यक्ती २००० मध्ये कंपनीच्या ५ टक्क्यांपेक्षा अधिक हिश्याचे अधिग्रहण करण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. २००५ मध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात वाटणी होऊन त्यांनी आपले स्वतंत्र उद्योग समूह स्थापन केले होते. 

काय आहे हे प्रकरण?


सेबीच्या आदेशानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांनी २००० मध्ये रिलायन्सचे ६.८३ टक्के शेअर विकत घेतले होते. हे अधिग्रहण करताना त्यांनी १९९४ मध्ये बाजारात आणलेल्या ३ कोटींच्या वारंटचा वापर केला होता. वारंट रुपांतरित करून हे शेअर विकत घेण्यात आले होते. सेबीच्या म्हणण्यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज प्रवर्तकांनी इतर काही लोकांशी संगनमत करून शेअर विकत घेण्यासंदर्भात कोणताही घोषणा केली नाही. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचेच शेअर विकत घेतल्यावर किंवा कंपनीतील आपली हिस्सेदारी वाढवल्यावर या बाबी जाहीर करणे सेबीच्या नियमानुसार आवश्यक आहे. मात्र अंबानी बंधू सेबीच्या या नियमांचे उल्लंघन केले होते. 

सेबीचा नियम


सेबीच्या नियमावलीनुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी कोणत्याही आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपेक्षा अधिक वोटिंग अधिकारांचे अधिग्रहण केले असल्यास (म्हणजेच वोटिंग शेअर विकत घेतले असल्यास) त्याच कंपनीच्या अल्प शेअरधारकांना यासंदर्भात माहिती दिली पाहिजे. सेबीच्या आदेशानुसार या प्रकरणात संबंधित व्यक्ती आणि संस्थांनी संयुक्तरित्या आणि स्वतंत्रपणे हा दंड भरावयचा आहे.

मुकेश अंबानींची घोडदौड

२००५ मध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी स्वतंत्र होत आपले स्वतंत्र उद्योग समूह उभे केले आहेत. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी मुकेश अंबानी यांच्याकडे राहिली होती. दरम्यान या पंधरा वर्षांच्या कालावधीत मुकेश अंबानी यांच्या आर्थिक प्रगतीची घोडदौड होत ते भारतातीलच नव्हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. रिलायन्स समूहाने १०० अब्ज डॉलरच्या बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला आहे. रिलायन्स समूहाच्या दूरंसंचार क्षेत्रातील जिओ आणि रिटेल क्षेत्रातील रिलायन्स रिटेल या कंपन्यांनी आपल्या क्षेत्रात मातब्बरी मिळवली आहे. आगामी काळात या कंपन्या रिलायन्स समूहाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

त्याउलट अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहाला मात्र ओहोटी लागली आहे. अनिल अंबानी हे दिवाळखोर झाले आहेत. त्यांच्यावर हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. त्यांच्या उद्योग समूहातील बहुतांश कंपन्या तोट्यात असून त्यांच्यावर मोठाली कर्जे आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी