unique concept of indian post: यंदाच्या राखी पौर्णिमेसाठी अर्थात रक्षाबंधन या बहीण भावाच्या उत्सवासाठी भारतीय पोस्टाने एक आकर्षक योजना सादर केली आहे. या अंतर्गत फक्त दहा रुपयांत बहीण भावाला राखी पाठवू शकणार आहे.
पोस्टाने योजना राबविण्यासाठी एक वॉटरप्रुफ पाकीट तयार केले आहे. पाऊस पडला तरी या पाकिटातील राखी भिजणार नाही असा दावा पोस्टाकडून केला जात आहे. अवघ्या दहा रुपयांत पोस्टाकडून या राखीसाठीच्या वॉटरप्रुफ पाकीटाची विक्री सुरू आहे. या पाकीटातून राखी सुरक्षितरित्या पाठविणे शक्य असल्याचे पोस्टाकडून सांगण्यात येत आहे.
दरवर्षी लाखो बहिणी त्यांच्या भावाला राखी पौर्णिमेच्या सुमारास पोस्टाद्वारे राखी पाठवतात. राखी पाठविण्यासाठी बहिणी स्पीड पोस्ट, रजिस्ट्री अथवा सामान्य पोस्ट यापैकी त्यांना योग्य वाटेल तो पर्याय निवडतात.
पोस्टाने दिलेल्या माहितीनुसार राखीसाठीच्या वॉटरप्रुफ पाकीटाची किंमत दहा रुपये आहे. या पाकिटात ठेवायची राखी संबंधित बहीण स्वखर्चाने आणि स्वेच्छेने आणते. पण हे राखीचे पाकीट स्पीड पोस्ट, रजिस्ट्री अथवा सामान्य पोस्ट यापैकी कोणत्या पर्यायाने पाठवायचे याचा निर्णय त्या बहिणीने घ्यायचा आहे. स्पीड पोस्ट, रजिस्ट्री आणि सामान्य पोस्ट या तिन्ही पर्यायांसाठी वेगवेगळा खर्च आहे. या खर्चाची माहिती जवळच्या पोस्टाच्या ऑफिसमध्ये अधिकृतरित्या मिळू शकते.
ज्या पत्त्यावर राखी पाठवायची आहे तो पत्ता व्यवस्थित लिहिला आणि संबंधित परिसराचा पीनकोड क्रमांक बिनचूक लिहिला तर राखी हमखास संबंधित ठिकाणी पोहोचेल अशी ग्वाही भारतीय पोस्टाकडून देण्यात आली आहे.
पोस्टाच्या योजनेचे अनेकांनी स्वागत केले आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक बहिणी आणि त्यांचे भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी, एकमेकांपासून दूर वास्तव्यास आहेत. कामाच्या व्यापांमुळे त्यांना राखी पौर्णिमेच्या निमित्ताने भेटणे शक्य नाही. शिवाय भारतात सध्या तरी राखी पौर्णिमा या सणासाठी सुटी दिली जात नाही. यामुळे ज्यांना एकमेकांच्या घरी जाणे शक्य नाही असे भाऊ बहीण राखी पौर्णिमेला पोस्टाच्या सेवेवर मोठ्या संख्येने अवलंबून असतात. बहिणीकडून पोस्टाने आलेली राखी बांधून घेऊन नंतर स्मार्टफोनद्वारे बहिणीला व्हिडीओ कॉल करणे अथवा राखीचे फोटो पाठवून देणे अशा पद्धतीने हल्ली अनेकजण संवाद साधू लागले आहेत.
संवादाचे आधुनिक पर्याय उपलब्ध झाले तरी पोस्टामार्फत राखी बहिणीने भावाला पाठविण्याची परंपरा आजही भारतात लाखो बहिणी पाळतात. यामुळे ई-मेल आणि स्मार्टफोनच्या युगात राखी पौर्णिमा जवळ येताच भारतीय पोस्ट विभागाचे महत्त्व एकदम वाढते. यंदाही तसेच चित्र आहे. पोस्टामार्फत राख्या घरोघरी पोहोचत आहेत. पोस्टाच्या वॉटरप्रुफ पाकिटाच्या योजनेलाही अनेकींकडून उत्तम प्रतिसाद आहे.