Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणुकदारांचे 3.28 लाख कोटी बुडाले

Share Market news Marathi: शेअर बाजारात आज मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाल्याने गुंतवणुकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Stock Market
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • गेल्या 10 सत्रांमधील शेअर बाजारातील तेजीला ब्रेक
  • गुंतवणुकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान
  • सेन्सेक्स 1000 पॉईंट्स तर निफ्टीमध्ये 290 पॉईंट्सने घसरण

Sensex and Nifty falls: गुरुवारी (15 ऑक्टोबर 2020) शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market falls) झाल्याचं पहायला मिळालं. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि आयटी कंपन्यांच्या (IT Companies) शेअर्समधील नफा वसुलीमुळे (Profit booking) घसरणीत आणखीनच भर पडली. ऑटो आणि मेटल शेअर्सच्या खरेदीमुळे शेअर बाजाराला थोडा आधार मिळाला अन्यथा घसरण आणखी झाली असती.

गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान

गुरुवारी झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 3.28 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी तब्बल 47 शेअर्स घसरणीसह बंद झाले. या घसरणीने गेल्या 10 सत्रांमधील शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लावला आहे. बीएसईच्या सेन्सेक्समध्ये गुरुवारी 1,066 पॉईंट्सने म्हणजेच 2.61 टक्क्यांनी घसरण होत 39,728 पॉईंट्सवर बंद झाला. तर निफ्टी 50 इंडेक्स 290 पॉईंट्सने म्हणजेच 2.43 टक्क्यांनी घसरणीसह 11,680 पॉईंट्सवर बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्सने दीड ते अडीच टक्क्यांची घसरण दिसून आली.

विश्लेषकांचा गुंतवणुकदारांना सल्ला

शेअर बाजारात गेल्या 10 सत्रांमध्ये सलग तेजी सुरू होती. गेल्या 13 वर्षांतील ही सर्वात मोठी तेजीची साखळी होती. विश्लेषकांच्या मते, शेअर बाजारात चढ-उतार कायम राहील. यामुळे गुंतवणुकदारांनी थोडी सावधगिरी आणि काळजी घेतली पाहिजे. इंडिया व्हीआयएक्समध्ये चार टक्क्यांनी तेजी आली आहे. हे बाजारातील चढ-उताराचे संकेत देतं. यात जर तेजी आली तर बाजारात घसरण होते.

दिन दयाळ इन्व्हेस्टमेंटचे टेक्निकल अॅनलिस्ट मनिष हाथीरमानी यांनी सांगितलं, "सकाळी बाजार उघडताच निफ्टी दिशाहीन दिसली. बाजार अद्यापही सकारात्मक असला तरी सत्रात चढ-उतारामुळे काही गोंधळाचे वातावरण राहिले. 12,030-12,040 च्या वर बाजार जाताच तेजी पहायला मिळेल. 11,800 चा टप्पा तुटला याचा अर्थ बाजार खाली येईल."

या कारणांमुळे बाजारात घसरण 

आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण

अमेरिकेच्या बाजारात बुधवारी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. असं मानलं जात आहे की, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही मदतीचं पॅकेज देण्यात येणार नाहीये.

अमेरिका-चीन यांच्यातील वाढता तणाव 

अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव वाढू शकतो. अमेरिकेत चीनच्या एंट ग्रुपला व्यापाराच्या काळ्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जर या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली तर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. ही बातमी शेअर बाजारासाठी चांगली बातमी नाहीये.

कोरोना संक्रमणात वाढ

युरोपातील अनेक देशांत पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे अनेक देशांतील सरकार पुन्हा लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन सदृश्य नियमांची अंमलबजावणी करु शकते. फ्रान्स सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे युरोपाती शेअर बाजारात सुद्धा नफा वसुली पहायला मिळालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी