Share Market: 'यामुळे' शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी वधारला!

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Sep 23, 2019 | 13:32 IST

Share Market Sensex Rises: शेअर बाजारात आज (सोमवार) सकाळच्या सुमारास जबरदस्त सुरुवात दिसून आली. कारण सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बरीच तेजी दिसून आली.

sensex rises 1300 points nifty crosses 11500 huge boom in the stock market due to the reduction in corporate tax
Share Market: 'यामुळे' शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी वधारला!  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण, सेन्सेक्स वधारला
  • मार्केट सुरु होताच सेन्सेक्समध्ये तब्बल १३०० अंकांची वाढ
  • निफ्टीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ, परदेशी गुंतवणूकदारांचीही मोठी गुंतवणूक

नवी दिल्ली: शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात खूपच चांगली झाली आहे. कारण की बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये आज (सोमवार) तब्बल १३०० अंकांची उसळी दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स तब्बल ३९००० अंशावर पोहचला आहे. तर निफ्टी देखील ११५०० अंशापर्यंत पोहचला आहे. दरम्यान, सरकारने शुक्रवारी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शुक्रवारी देखील बाजारात तेजी दिसून आली होती. त्याचाच परिणाम आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दिसून आला. त्यामुळे सकाळच्या सेशनमध्ये सेन्सेक्स १३०० अंशानी वधारला असल्याचं दिसून आलं. आज बाजारात HDFC बँक, ITC, L&T आणि ICICI बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. 

सेन्सेक्स ३९३४६ अंशांवर पोहोचल्यानंतर ७९० अंकांच्या तेजीसह ट्रेड करत होता. तर निफ्टी देखील २४० अंकांच्या तेजीसह ट्रेड करत आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १० वर्षातील सर्वात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. 

दरम्यान, कोटक महिंद्रा एएमसीमध्ये एसव्हीपी शिबानी कुरियन यांच्या मते, कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्यात आल्याने कॉर्पोरेट इंडियाचा नफा वाढविण्यासाठी उचलण्यात आलेलं मोठं पाऊल आहे. टॅक्समध्ये कपात केल्याने कॉर्पोरेट कंपन्यांची मोठी बचत होणार आहे. 

आज आयटीसी, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एलअँडटी, एचयूएल, मारुती, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साह दिसून आला आहे. त्याच्याच चांगला परिणाम हा शेअर बाजारात सध्या दिसत आहे. 

दरम्यान, आशियातील अनेक शेअर बाजार हे मात्र, घसरणीसह ट्रेड करत आहेत. शांघाई, हाँगकाँग, टोकियो आणि सिओलच्या शेअर बाजारात निगेटिव्ह झोन ट्रेड सुरु आहे. तर सकाळच्या सेशनमध्ये रुपया ७०.९४ सह फ्लॅट ट्रेड करत होता. ब्रेंट क्रूडमध्ये १ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. सध्या हे ६४.९६ वर ट्रेड करत आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ३५.७८ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. तर देशातील गुंतवणूकदारांनी तब्बल ३००१.३२ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी