'या' कंपनीचा मालक कर्जबाजारी, मात्र गुंतवणुकदारांचा पैसा झाला डबल

अनिल अंबानी हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. मात्र रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (Reliance Infrastructure Ltd) या त्यांच्या उद्योग समूहातील एका कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

Reliance Infra investors make huge money
रिलायन्स इन्फ्राच्या गुंतवणुकदारांची जबरदस्त कमाई 

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या शेअरने २०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
  • कर्जबाजारी अनिल अंबानी उद्योग समूहातील कंपनी
  • गुंतवणुकदारांचे पैसै ६ महिन्यातच दुप्पट

मुंबई : अनिल अंबानी हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. त्यांच्या उद्योगसमूहातील बहुतांश कंपन्यांवर मोठाली कर्जे आहेत. थकित कर्जाच्या निमित्ताने आणि उद्योग समूहातील कंपन्यांना होणाऱ्या तोट्यामुळे अनिल अंबानी (Anil Ambani) हे चर्चेत असतात. मात्र रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (Reliance Infrastructure Ltd) या त्यांच्या उद्योग समूहातील एका कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल (Investors made money)केले आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इन्फ्रा (Reliance Infra)या कंपनीच्या शेअरने २०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर मागील १२ महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत (Share price) तब्बल २६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ पासून आतापर्यत रिलायन्स इन्फ्राच्या शेअरच्या किंमतीत १६० टक्क्यांची तेजी आली आहे. त्यामुळे फक्त वर्षभरातच रिलायन्स इन्फ्राच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यांचा पैसा डबलपेक्षाही (Investment value doubled) जास्त म्हणजे जवळपास अडीचपट झाला आहे. (Anil Ambani group is debt ridden, but investors of Reliance Infra doubled their money in 6 months)

कंपनी असे उभारणार ५५० कोटी रुपये


रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाने प्रेफरेन्शियल शेअर इश्यू करून ५५०.५६ कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. हे भांडवल कंपनीच्या कामकाज, भविष्यातील योजना आणि कर्जाच्या परतफेडीसाठी दीर्घकालीन स्त्रोत म्हणून वापरले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. हे भांडवल कंपनीचे प्रवर्तक समूह आणि वीएफएसआय होल्डिंग्स प्रा. लि.ला ८.८८ कोटी शेअर किंवा वॉरंट इश्यू करून उभारले जाणार आहे. वॉरंटच्या संख्येइतकेच इक्विटी शेअर असणार आहेत. वीएफएसआय होल्डिंग्स कंपनी, वार्डे इन्व्हेस्टमेंट पार्टनर्सचीच सहाय्यक कंपनी आहे. या प्रक्रियेद्वारे प्रवर्तक समूह ४०० कोटी रुपये आणि वार्डे समूह १५० कोटी रुपयांचे भांडवल ओतणार आहे.

२०२१मध्ये गुंतवणुकदारांचा पैसा झाला डबल


२ डिसेंबर २०२०ला रिलायन्स इन्फ्राच्या शेअरची किंमत २२.८५ रुपये प्रति शेअर इतकी होती. तर ७ जून २०२१ला कंपनीच्या शेअरची किंमतीत वाढून ७३.२५ रुपये प्रति शेअरवर पोचली. या कालावधीत रिलायन्स इन्फ्राच्या शेअरच्या किंमतीत २२० टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षातच कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २६५ टक्क्यांची घवघवीत वाढ झाली आहे. मागील ५ महिन्यातच कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १६० टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्या गुंतवणुकदारांनी अनिल अंबानींच्या या कंपनीत गुंतवणूक केली होती ते मालामाल झाले आहेत. त्यांचे पैसे फक्त ६ महिन्यातच दुप्पट झाले आहेत.

रिलायन्स इन्फ्राच्या तोट्यात घट


मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचा तोटा कमी होऊन ४६.५३ कोटी रुपयांवर आला होता. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीला १५३.४८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीकडून सांगण्यात आले की जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून ४,६१०.७२ कोटी रुपयांवर पोचले होते. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला ४,०१२.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी