Multibagger Stock: फक्त १ लाखाचे ८ कोटी १८ लाख करणारा सुपर डुपर केमिकल शेअर

Multibagger Stock: २० वर्षापूर्वी या शेअरची किंमत फक्त ११.३० रुपये इतकी होती. म्हणजेच या शेअरने २० वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकदारांना जवळपास ८१,७५८ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे.

Multibagger share with huge returns
धुवाधार कमाई करून देणारा अतुल लि.चा मल्टीबॅगर शेअर 

थोडं पण कामाचं

  • काही छोटे शेअर ज्यांची किंमतदेखील फारच नगण्य असते, असे शेअर दीर्घकालावधीत गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवतात
  • अतुल लि.ने गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे
  • मागील २० वर्षात या शेअरमधील गुंतवणूक ८१८ पटींनी वाढली आहे.

मुंबई: शेअर बाजारातील सध्याच्या जबरदस्त तेजीमुळे अनेक शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. शेअर बाजारात चांगली कमाई करण्यासाठी संयम हा महत्त्वाचा मंत्र आहे. दीर्घकालावधीसाठी संयम राखत केलेली गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. कारण शेअर खरेदी करून लगेच त्याची विक्री करून पैसा कमावता येत नाही. तर दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास अनेकपट लाभ मिळवता येतो. सुरूवातीला अतिशय किरकोळ वाटणारा शेअर नंतर मोठ्या पातळीवर पोचलेला असतो. हे शेअर दीर्घकाळात गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवतात, दणदणीत कमाई करून देतात. त्यामुळेच या शेअरने मल्टीबॅगर शेअर (Multibagger share) म्हणतात, कारण ते पैसा काही पटींनी वाढतात. असाच एक शेअर आहे अतुल लिमिटेड (Atul Limited) या केमिकल क्षेत्रातील कंपनीचा. सध्या अतुल लि.च्या शेअरची किंमत ९,२५० रुपये प्रति शेअर आहे. (Share market: Multibagger Stock, Investment of Rs 1 lakh in Atul Limited become Rs 8.18 crore in 20 years)

गुंतवणूक ८१८ पट करणारा बंपर शेअर

अतुल लि.च्या शेअरने मागील २० वर्षात गुंतवणुकदारांसाठी जबरदस्त संपत्ती निर्माण (Wealth creation)करून दिली आहे. सध्या या शेअरची किंमत ९,२५० रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. शेअर आपल्या आतापर्यतच्या उच्चांकी पातळीवर आहे. २० वर्षापूर्वी या शेअरची किंमत फक्त ११.३० रुपये इतकी होती. म्हणजेच या शेअरने २० वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकदारांना जवळपास ८१,७५८ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. २० वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ८ कोटी १८ लाख रुपये झाले आहे. फक्त १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीने (Investment) या शेअरने गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.  मागील फक्त सहा महिन्यातच या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत ६,७८४ रुपये प्रति शेअरवरून ९,२५० रुपये झाली आहे. ही वाढ ३६ टक्के इतकी जबरदस्त आहे. तर मागील १२ महिन्यात अतुल लि.च्या शेअरच्या किंमतीत ४७ टक्के तेजी आली आहे. मागील ७ वर्षात हा शेअर तब्बल २१ टक्क्यांनी वाढला आहे. मार्च २०१४ मध्ये हा शेअर ४२६ रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. म्हणजेच फक्त ७ वर्षांचा कालावधी जरी लक्षात घेतला तरी या शेअरने १ लाख रुपयांचे २१ लाख रुपये केले आहेत.

अतुल लि.चा व्यवसाय

अतुल लि. या कंपनीची स्थापना ५ सप्टेंबर १९४७ला झाली होती. ही एक केमिकल कंपनी असून कंपनी तब्बल ९०० प्रकारची केमिकल्सचे उत्पादन करते. गुजरातच्या वलसाड येथे कंपनीचे मुख्यालय आहे. याशिवाय कंपनीचे १४० रिटेल ब्रॅंड आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने जवळपास ३,६१६ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता. 

शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर पोचले असून या तेजीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दिसत असल्याने शेअर बाजाराच्या तेजीला वातावरण अनुकूल झालेले दिसत आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी