टाटांचा 'हा' ४ रुपयांचा शेअर फक्त वर्षभरात पोचला ४७ रुपयांवर, एक लाखाचे केले बारा लाख रुपये

९ जून २०२०ला हा शेअर ३.८२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर होता. सध्या हा शेअर मुंबई शेअर बाजारात ४६.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त १२ महिन्यात गुंतवणूक जवळपास १२ पटीने वाढली

Share Market Investment
शेअर बाजारातील गुंतवणूक 

थोडं पण कामाचं

  • टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरने वर्षभरात दिला १,१२९ टक्क्यांचा परतावा
  • एक लाख रुपयांचे केले १२ लाख रुपये
  • टाटांच्या योग्य पावलांमुळे शेअरमध्ये तेजी

मुंबई: टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लि.च्या शेअरने गुंतवणुकदारांना फक्त १२ महिन्यातच १,१२९ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. ज्या गुंतवणुकादारांनी वर्षभरापूर्वी टाटा टेलिसर्व्हिसेसचा (Tata Teleservices (Maharashtra) Ltd) शेअर विकत घेतला होता, त्यांनी दणदणीत पैसे कमावले आहेत. ९ जून २०२०ला हा शेअर ३.८२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर होता. सध्या हा शेअर मुंबई शेअर (Share Market) बाजारात ४६.९५ रुपये प्रति शेअरच्या  पातळीवर व्यवहार करतो आहे. वर्षभरापूर्वी तुम्ही जर टाटा टेलिसर्व्हिसेस लि.च्या शेअरमध्ये १ लाख लाख रुपये गुंतवले (Investment) असते तर त्या गुंतवणुकीचे (Investment value) मूल्य आज तब्बल १२.२९ लाख रुपये इतके झाले असते. म्हणजेच फक्त १२ महिन्यात गुंतवणूकीचे मूल्य जवळपास १२ पटीने वाढले असते. (The Share of Tata Teleservices (Maharashtra) Ltd has become Multibagger by giving returns of 1,129 % in jus one year)

१२ महिन्यात १,०८६ टक्क्यांची वाढ

वर्षभरात सेन्सेक्सने ४२.५८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मात्र टाटांच्या या शेअरने याच कालावधीत १,०८६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यावर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच जानेवारी २०२१पासून ते आतापर्यत टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरने ४८९ टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. तर मागील फक्त एका महिन्यात या शेअरची किंमत ११३ टक्क्यांनी वाढली आहे. अर्थात आज या शेअरला लोअर सर्किट लागत याच्या किंमतीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. आज दिवसअखेर शेअर बाजार बंद झाला तेव्हा टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लि.चा शेअर ४६.४५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर होता.

प्रमोटर्सच्या मालकीचा मोठा हिस्सा

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लि.चा शेअर आपल्या ५ दिवस, २० दिवस, ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवसांच्या मुव्हिंग सरासरीपेक्षा वरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. मागील तीन दिवसांत या शेअरच्या किंमतीत चांगलीच घसरण होत मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजारमूल्य आता ९,१७८ कोटी रुपयांचे झाले आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा ७४.३६ टक्के इतका असून सर्वसाधारण गुंतवणुकदारांकडे २५.६४ टक्के शेअरची मालकी आहे. ही आकडेवारी मार्चअखेरची आहे. डिसेंबरअखेरपर्यत या शेअरमध्ये कोणतीही परकी गुंतवणुकदारांची गुंतवणूक नव्हती. मात्र मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत दोन परकी गुंतवणुकदारांनी यामध्ये ०.०१ टक्के हिस्सा विकत घेतला होता. टेलिकॉम क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत टाटांच्या या कंपनीच्या शेअरने दमदार कामगिरी केली आहे.

टाटांनी उचललेल्या योग्य पावलांचा सकारात्मक परिणाम

मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लि.ने २८८.२९ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. तर याच कालावधीत म्हणजेच मागील वर्षी मार्चअखेर कंपनीने ८७३.९६ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. जून २०२०अखेर कंपनीने १,०६९ कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली होती. मात्र तेव्हापासून कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होत तोटा कमी होतो आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीवर एकूण १७,७७४.४७ कोटी रुपयांचे कर्ज आहे. अलीकडच्या काळात टाटा सन्सने टाटा टेलिसर्व्हिसेससाठी उचललेल्या पावलांमुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली होती. हाती आलेल्या माहितीनुसार कंपनीची पुनर्उभारणी होत आता ती टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस या नावान व्यवसाय करणार असून लघु आणि मध्यम कंपन्यांना, व्यवसायांना सेवा पुरवणार आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी