Share Market Total wealth | मुंबई : शेअर बाजारासाठी २०२१ हे वर्ष अभूतपूर्व होते. या सरलेल्या वर्षात शेअर बाजाराने (Share market) नवी उच्चांकी पातळी गाठत विक्रम नोंदवला आहे. कोरोना (Corona) संकटाने २०२० मध्ये झटका दिल्यानंतरदेखील २०२१ मध्ये बाजाराने प्रचंड तेजी दाखवत इक्विटी गुंतवणुकदारांची संपत्तीत थोडी थोडकी नव्हे तर ७८ लाख कोटी रुपयांची (Total market capital) भर पडली आहे. संपूर्ण वर्ष हे बाजारातील गुंतवणुकदार आणि बाजार यांच्यासाठी ऐतिहासिक (Historic year for share market)ठरले आहे. हात लावेन ते सोने, या थाटात गुंतवणुकदारांना बेधडक कमाई करण्याचे हे वर्ष होते. अनेक शेअर्स मल्टीबॅगर्स शेअर्स बनले आहेत. सरलेल्या वर्षात शेअर बाजाराने अनेक विक्रम मोडले आणि वर्षातील शेवटच्या दिवशीदेखील तेजी नोंदवली. (Share market total investment rise by Rs 78 lakhs crore in 2021, set new records)
तीस शेअरच्या आधारावर असलेल्या सेन्सेक्समध्ये वार्षिक पातळीवर २०२१ मध्ये १०,५०२.४९ अंशांची वाढ झाली आहे. म्हणजे मुंबई शेअर बाजाराने वर्षभरात २१.९९ टक्क्यांची उसळी घेतली आहे. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या संकटाची सुरूवात झाल्यानंतर सेन्सेस्क गंटागळ्या खात पार झोपला होता. मात्र त्यानंतर सेन्सेक्सने मुसंडी मारत जी घोडदौड केली त्यामुळे अनेकांना आयुष्यभराची कमाई करण्याची संधी मिळाली. २०२१ मध्ये सेन्सेक्सने ५०,००० आणि ६२,००० अंशाची पातळी ओलांडून दाखवली. या संपूर्ण वर्षात सेन्सेक्स फक्त तीन महिने तोट्यात किंवा मंदीत होता. उर्वरित ९ महिने सेन्सेक्सने तुफान घोडदौड करत कमाईच कमाई करून दिली आहे.
शेअर बाजारासाठी ऑगस्ट २०२१ हा महिना धमाल होता. या महिन्यात सेन्सेक्स ४,९६५.५५ अंशांनी वधारून ९.४४ टक्क्यांची वाढ नोंदवत सुसाट सुटला होता. १९ ऑक्टोबरला तर शेअर बाजाराने इतिहास घडवत आतापर्यतची सर्वात उच्चांकी पातळी म्हणजे ६२,२३५.४३ अंशांची पातळी नोंदवली होती. या वर्षभरात मुंबई शेअर बाजारातील एकूण नोंदणीकृत किंवा सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात ७७,९६,६९२.९५ कोटी रुपयांची वाढ होत ते २,६६,००,२११.५५ कोटी रुपयांवर पोचले आहे. गुंतवणुकदारांना अफाट संपत्ती कमावून देणारा बाजारातील एकूण समभाग भांडवल १८ ऑक्टोबर २,७४,६९,६०६.९३ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचले होते.
आज ३१ डिसेंबर २०२१ला वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि वर्षातील बाजाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजी नोंदवत बंद झाला. सेन्सेक्सने ४५९ अंशांची तेजी दाखवली आणि ५८,२५३ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १५० अंशांनी वधारून १७,३५४ अंशांच्या पातळीवर पोचला. आज टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बॅंक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया या शेअर्सनी तेजी दाखवली. तर एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि पावर ग्रिड यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण भागभांडवल २६५.९७ लाख कोटी रुपयांवर पोचले. यावर्षी सर्वाधिक तेजी दाखवणारा आणि सर्वाधिक घसरण नोंदवणारा असे दोन्ही शेअर्स हे ऑटो सेक्टरचे आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरने वर्षभरात १६२ टक्के तेजी दाखवली तर हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये २१ टक्क्यांची घसरण झाली.