अक्षय तृतीयेनिमित्त करा सोन्यात गुंतवणूक, सोव्हेरन गोल्ड बॉंडचा पर्याय तुम्हाला करेल मालामाल

काम-धंदा
Updated May 14, 2021 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sovereign Gold Bond Scheme : सोव्हेरन गोल्ड बॉंड हा सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय समजला जातो. काय आहे हे सोव्हेरन गोल्ड बॉंड, त्यात गुंतवणूक कशी करायची, त्यातील नेमके फायदे कोणते, हे जाणून घेऊया.

Investment in Sovereign Gold Bond
सोव्हेरन गोल्ड बॉंड, सोन्यातील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय 

थोडं पण कामाचं

  • सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक
  • पात्रता, फायदे आणि गुंतवणूक कालावधी
  • सुरक्षित गुंतवणूक आणि भरघोस परतावा

नवी दिल्ली : अक्षय तृतिया हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त आहे. त्यामुळे अक्षय तृतियेला अनेक गोष्टींची सुरुवात केली जाते. अक्षय तृतियेला सोन्यातदेखील गुंतवणूक करण्याची परंपरा आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात जागतिक अर्थव्यवस्थेत आणि सर्वच गुंतवणूक प्रकारात एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणुकदारांचा कल असतो, कारण सोन्याती गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. शिवाय बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या भावाला चांगलीच झळाळी आली आहे. 

अक्षय तृतियेच्या निमित्ताने गुंतवणूक

मागील वर्षभरात सोन्यातील गुंतवणुकीने चांगलाच परतावा दिला आहे. अशावेळी अक्षय तृतियेच्या निमित्ताने तुम्हीदेखील सोन्यात गुंतवणूक करू शकता. सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आज आपण येथे सोव्हेरन गोल्ड बॉंडविषयी जाणून घेऊया. सोव्हेरन गोल्ड बॉंड हा सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय समजला जातो. काय आहे हे सोव्हेरन गोल्ड बॉंड, त्यात गुंतवणूक कशी करायची, त्यातील नेमके फायदे कोणते, हे जाणून घेऊया. 

सोव्हेरन गोल्ड बॉंडची घोषणा

अर्थमंत्र्यांनी चालू वर्षासाठी सोव्हेरन गोल्ड बॉंडच्या सहा टप्प्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. याला सोव्हेरन गोल्ड बॉंड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) २०२१-२२ सेरिज I-VI असे म्हणतात. सोव्हेरन गोल्ड बॉंड स्कीम २०२१-२२ च्या पहिल्या टप्प्याची सुरूवात १७ मेला होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. चालू आर्थिक वर्षासाठीच्या सहा टप्प्यांच्या किंवा सहा हफ्त्यांच्या सेरिज I-VIसाठीच्या तारखा अर्थमंत्रालयाने जाहीर केल्या आहेत.

सोव्हेरन गोल्ड बॉंड काय असतात?


सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond ) हे रिझर्व्ह बॅंक किंवा अर्थमंत्रालयाकडून बाजारात आणले जातात. यात किमान १ ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करता येते तर कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक केल्यावर प्रत्यक्ष सोने मिळत नाही तर सर्टिफिकेटच्या रुपात ही गुंतवणूक असते. आठ वर्षांच्या कालावधीसाठी ही गुंतवणूक असते. सध्या असलेल्या बाजारभावाने तुम्ही गुंतवणूक करायची असते आणि आठ वर्षानंतर (यात ५ वर्षांचा लॉकइन कालावधी आहे, ५ वर्षांनी तुम्ही गुंतवणूक काढून घेऊ शकता) त्यावेळेस असलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तुम्हाला दिले जाते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने १० ग्रॅम सोन्याच्या मूल्याएवढी गुंतवणूक आज केली तर ८ वर्षांनी १० ग्रॅम सोन्याच्या जो काही भाव असेल तितकी रक्कम त्या गुंतवणुकदारास मिळेल. शिवाय दरवर्षी २.५ टक्के इतके व्याजदेखील सरकारकडून दिले जाते. 
सोन्यातील गुंतवणूक आणि तीदेखील सरकारच्या बॉंडमधील त्यामुळे सोव्हेरन गोल्ड बॉंड ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते आणि शिवाय परतावादेखील चांगला मिळतो.

सोव्हेरन गोल्ड बॉंडच्या सेरिज I-VI च्या तारखा


सोव्हेरन गोल्ड बॉंड म्हणजेच एसजीबीच्या पहिल्या सेरिजमध्ये १७ मे ते २१ मे दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. दुसऱ्या सेरिजमध्ये २४ मे ते २८ मे दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. तिसऱ्या सेरिजमध्ये ३१ मे ते ०४ जून दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. तर चौथ्या सेरिजमध्ये १२ जुलै ते १६ जुलै दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. एसजीबीच्या पाचव्या सेरिजमध्ये १७ ऑगस्टला गुंतवणूक करता येईल, तर शेवटच्या म्हणजेच सहाव्या सेरिजमध्ये ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. 

कुठे करतात सोव्हेरेन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक


सोव्हेरन गोल्ड बॉंडची विक्री शेड्युल्ड कमर्शियल बॅंक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी केली जाते. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रत्यक्ष शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

कोण करू शकतो गुंतवणूक?


सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये भारतीय नागरिक, मोठे गुंतवणुकदार, ट्रस्ट, विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था गुंतवणूक करू शकतात.

मॅच्युरिटी, पात्रता आणि किती गुंतवणूक करता येते


सोव्हेरन गोल्ड बॉंडचा कालावधी ८ वर्षांचा असतो. मात्र याला पाच वर्षांचा लॉकइन कालावधी असतो. म्हणजे पाच वर्षानंतर तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. यामध्ये १ ग्रॅम सोन्यापासून गुंतवणूक करता येते आणि त्याच पटीत ही गुंतवणूक वाढवतादेखील येते. कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. ट्रस्टना यात जास्तीत जास्त २० किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. ही एकूण मर्यादा असून यात वर्षभरातील विविध टप्प्यात केलेली गुंतवणूक आणि मनी मार्केटमधून केलेली सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक यांचाही समावेश आहे.

२०२१-२२ साठी सोव्हेरन गोल्ड बॉंडची किंमत


सोव्हेरन गोल्ड बॉंडची किंमत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या भावावरून ठरवली जाते. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशन लि.ने आठवड्याच्या तीन कार्यालयीन दिवसांत जाहीर केलेल्या भावाप्रमाणे सोव्हेरन गोल्ड बॉंड ज्या दिवशी खुले करण्यात आले असतील त्या दिवसाच्या सोन्याच्या भावाप्रमाणे गुंतवणूक केली जाते. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये जे गुंतवणुकदार ऑनलाईन किंवा डिजिटल स्वरुपात गुंतवणूक करतात आणि पेमेंट करतात त्यांना बाजारभावापेक्षा ५० रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळते.

व्याज आणि इतर फायदे


सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज मिळते. हे व्याज सहामाही स्वरुपात दिले जाते. सोव्हेरन गोल्ड बॉंडवर मिळणारे व्याज हे प्राप्तिकर नियम १९६१ नुसार करपात्र असते. मात्र सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात करवजावट मिळते. याशिवाय सोव्हेरन गोल्ड बॉंडवर तुम्हाला बॉंड तारण ठेवून कर्जदेखील मिळते.कर्जाचे सोन्याच्या मूल्याशी असलेले गुणोत्तर हे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सोन्यावर दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीच्या सूचनांप्रमाणे ठरवले जाते. 

सोव्हेरन गोल्ड बॉंडच्या सुवर्णसंधीचा तुम्हीदेखील लाभ घ्या आणि चांगली कमाई करा. अक्षय तृतियेला सोन्यात गुंतवणूक करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणुकीने या पंरपरेला आणखी सोनेरी करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी