Soybean rate fall | नवी दिल्ली : खाद्य तेल (Edible oil) आणि तेलबिया यांचे भाव हे नेहमीच चर्चेत असतात आणि ते चिंतेचा विषय देखील असतात. एकीकडे भाव वाढल्यावर ग्राहक त्रस्त असतो, तर दुसरीकडे भाव पडल्यावर शेतकरी हवालदिल होतो. तर काहीवेळा दोघांच्याही तोंडचे पाणी पळालेले असते. मागील काही आठवड्यांपासून काही तेलबिया आणि खाद्यतेल यांच्या भावांमध्ये चढउतार दिसत आहेत. यात सोयाबीन (Soybean)प्रामुख्याने आहे. सोयाबीनला बाजारात मिळणारा भाव (soybean rate) हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या (Farmers) चिंतेचा विषय झाला आहे. सोयाबीनच्या भावात ५०० ते ६०० रुपयांपर्यत घसरण झाली आहे. (Soybean rate fall this week, farmers under pressure, check today price)
सोयाबीनचे उत्पादन घेऊन देखील भाव नसल्याने साठवलेल्या सोयाबीनबाबत शेतकरी त्रस्त आहे. आधीच्याच सोयाबीनला बाजारात भाव नसताना नवा सोयाबीन बाजारात येण्याचीही स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी काय करायचे हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्नच आहे. सध्या सोयाबीनचा भाव (Soybean price) ६,००० रुपयांच्या आसपास किंवा खाली आहे. क्वचितच एखाद दुसऱ्या बाजारसमितीत सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. मेहकर बाजार समितीत ७००० रुपयांचा आणि अकोल्यात ६५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. आठवडाभरापूर्वी ७००० रुपये असलेला भाव आता आणखी खाली आला आहे. सोयाबीनच्या राज्यातील महत्त्वाच्या बाजारात चांगली आवक झाली आहे.
वायदा बाजारात तेलाचे भाव खालच्या पातळीवर आहेत. काही काळापूर्वी स्टॉक करण्यावर मर्यादा असल्याने व्यापारी, खाद्य तेलाच्या मिल आणि शेतकरी यांनी मोहरीचा स्टॉक कमी केला होता. यामुळे मोहरीच्या तेलाच्या भावात घसरण झाली आहे. मोहरीची उपलब्धता कमी झाली आहे. मोहरीचे पुढील पीक येण्यास अजून दोन अडीच महिन्यांचा वेळ आहे. शेतकऱ्यांना मोहरीचा चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीपीओ आणि पामोलीनच्या आयातदारांना प्रति किलो ३ ते ४ रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाल्यामुळे आणि हिवाळ्यात मागणी घटल्यामुळे सीपीओ आणि पामोलीन तेलाच्या भावात घसरण झाली आहे.