जर आपण एसबीआयचे ग्राहक असाल, तर आपल्यासाठी महत्त्वाची बातमी

काम-धंदा
Updated May 25, 2019 | 15:20 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

SBI News: देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी एक विशेष कार्य केलंय. ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक मोठा निर्णय बँकेनं घेतलाय. जाणून घ्या या निर्णयाबाबत.

State Bank Of India
एसबीआयनं ग्राहकांसाठी उचललं हे पाऊल 

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या असलेल्या एसबीआयनं ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एका विशेष संमेलनाचं आयोजन केलंय. ग्राहकांसाठीचं हे संमेलन राष्ट्रीय स्तरावर असून २८ मे रोजी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या विशेष निर्णयाअंतर्गत बँक आपल्या १७ स्थानिक मुख्य कार्यालयांद्वारे (एलएचओ) ५०० हून अधिक जागी बँकेचा ग्राहकांचा मेळावा घेणार आहे. या अंतर्गत बँकेचा प्रत्येक ठिकाणच्या मेळाव्यातून आपल्या १ लाखांहून अधिक ग्राहकांच्या संपर्कात येण्याचा मानस आहे.

बँकेचे मॅनेजिंग डिरेक्टर (रिटेल आणि डिजिटल) पी. के. गुप्ता यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलं की, ‘या संमेलनाचा (मेळाव्याचा) उद्देश ग्राहकांशी संपर्क साधून बँकेबाबतचा ग्राहकांच्या मनातील विश्वास वाढवणं हा आहे. तसंच त्यांच्या तक्रारी ऐकून आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणं होय. हा ग्राहकांसाठी एक चांगला अनुभव असेल.’

या संमेलनामुळे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत होईल, असंही गुप्ता यांनी सांगितलं. स्टेट बँकेचे सर्व ज्येष्ठ अधिकारी या संमेलनात भाग घेणार आहेत. या संमेलनादरम्यान ग्राहक बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलू शकतील. तसंच आपल्या तक्रारी आणि बँकेच्या इतर सेवांबाबत माहिती घेऊ शकतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेजवळ २९ लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट आहे. बँकेची होम लोन आणि ऑटो लोनच्या क्षेत्रात ३५ टक्क्यांची भागिदारी आहे. स्टेट बँकेच्या देशात एकूण २२ हजार १० शाखा आहेत आणि ५८ हजार एटीएम आहेत.

बँकेनं १ मे पासून बदलले तीन नियम

दरम्यान, १ मे पासून बँकेनं आपल्या खातेदारांसाठी तीन नियमांमध्ये बदल केलेला आहे. बँकेनं १ मे पासून अल्प मुदतीची कर्जे आणि सेव्हिंग बँक डिपॉझिट्स आरबीआयच्या रेपो रेटशी जोडली आहेत. तसंच बँकेनं सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या खातेदारांना १ लाख रुपयापर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदारांना कॅश क्रेडिट आणि वोव्हर ड्राफ्ट मर्यादा सुद्धा एक लाख रुपये केली असून त्याला रेपो रेटशी जोडलं गेलंय. बँकेनं नियमांत केलेला तिसरा बदल म्हणजे जर ग्राहकाच्या खात्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असेल तर, एसबीआय त्यावर वर्षाला ३.५० टक्के दरानं व्याज देत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जर आपण एसबीआयचे ग्राहक असाल, तर आपल्यासाठी महत्त्वाची बातमी Description: SBI News: देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी एक विशेष कार्य केलंय. ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक मोठा निर्णय बँकेनं घेतलाय. जाणून घ्या या निर्णयाबाबत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola