11 year old millionaire | ही गोष्ट आहे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कोट्यधीश झालेल्या एका मुलीची. आपण कोट्यधीश व्हावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्नही करत असतो. त्यातील अनेकांना त्यात यश येतं, तर काहींचं स्वप्न हे कायमच स्वप्न राहतं. मात्र कोट्यधीश बनणं ही काही सोपी गोष्ट नाही, हे मात्र खरं. मात्र एक अशी मुलगी आहे, जिनं कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहण्याअगोदरच ती कोट्यधीश झाली. कोट्यवधी रुपयांची मालकीण होण्याचा तिचा हा प्रवास सुरू झाला लिंबू पाणी विकण्यापासून.
या मुलीचं नाव आहे मिकाईला उलमेर. ती आता 17 वर्षांची आहे. अकराव्या वर्षी तिनं लिंबू पाणी म्हणजेच लेमनेड विकण्याचा व्यवसाय सुरू केला. काही दिवसांतच तिनं स्वतःचा लेमनेडचा ब्रँड प्रस्थापित केला. थोड्याच दिवसात हा ब्रँड इतका प्रसिद्ध झाला की 2016 साली तिला एक भन्नाट ऑफर आली. Whole Foods Market या मोठ्या कंपनीनं मिकाईलाच्या कंपनीसोबत एक करार केला. या कराराचे मिकाईलाला 85 कोटी रुपये मिळाले आणि एका रात्रीत ती कोट्यधीश झाली.
nypost.com नं दिलेल्या वृत्तानुसार मिकाईला चार वर्षांची असताना तिला तिच्या पणजीकडून एक पुस्तक मिळालं. 1940 साली लिंबू पाणी तयार करण्याची आरोग्यपूर्ण पद्धत कशी होती, हे तिला त्या पुस्तकातून समजलं. तिने तशीच रेसिपी प्रत्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीत लिंबू पाणी करण्यासाठी जवसाच्या बियांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. जवस हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. मुबलक प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्स आणि फायबर त्यात असतात. काहीजण याचं वर्णन ‘फंक्शनल फूड’ असंही करतात. कुठलीही व्यक्ती स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग करू शकते. आशियातील अनेक देशांत आयुर्वेदिक उपचारांमध्ये जवसाचा वापर करण्यात येतो.
मिकाईलाने अकरा वर्षांची असताना लिंबू पाणी तयार करून ते आपल्या घराबाहेर विकायला सुरुवात केली. आपली खासियत म्हणून ती लिंबूपाण्यात मध वापरत असे. हळूहळू तिनं तयार केलेलं लेमनेड लोकांना आवडायला सुरुवात झाली. काही दिवसांनी मध मिळवण्यासाठी मिकाईलानं मधमाशी पालनाचा व्यवसायही सुरु केला. तिने आपल्या ब्रँडला नाव दिलं Me and the Bees Lemonade.
साखर ही आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे मी माझ्या लेमनेडमध्ये नेहमीच मधाचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याचं ती म्हणते. घराबाहेर लावलेल्या दुकानापासून ते मोठमोठे करार करण्यापर्यंत मिकाईलानं यश संपादन केलं. 2015 साली मिकाईलाला Shark Tank या टीव्ही शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्याचवेळी मिकाईलानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही लेमनेड दिलं. त्यानंतर तिच्या ब्रँडची लोकप्रियता अधिकच वाढली.