बिगबास्केटनंतर आता 1mg फार्मसीदेखील टाटा डिजिटलची गुंतवणूक

टाटा डिजिटल (Tata Digital) या टाटा समूहाच्याच उपकंपनीकडून डिजिटल हेल्थ कंपनी असलेल्या 1mg मध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. टाटा समूहाकडून (Tata Group) यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.

Tata Digital to acquire online pharmacy 1mg
1mg या ऑनलाईन फार्मसी स्टार्टअपमध्ये टाटा डिजिटलची मोठी गुंतवणूक 

थोडं पण कामाचं

  • 1mgमधील टाटांची गुंतवणूक
  • टाटा डिजिटलचा विस्तार
  • क्युअरफिट टाटांच्या पंखाखाली

नवी दिल्ली : टाटा डिजिटल (Tata Digital) या टाटा समूहाच्याच उपकंपनीकडून डिजिटल हेल्थ कंपनी असलेल्या 1mg (1mg, online Pharmacy)मध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. टाटा समूहाकडून (Tata Group) यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. सुपर अॅपच्या बांधणीसाठी करण्यात येत असलेल्या अनेक गुंतवणुकींपैकी ही एक गुंतवणूक आहे. याआधीच टाटा डिजिटलने बिगबास्केट (Big Basket) विकत घेतले आहे आणि क्युअरफीटमध्ये (Curefit) देखील मोठी गुंतवणूक केली आहे. (Tata Digital invests in online pharmacy 1mg to acquire majority stake)

1mgमधील टाटांची गुंतवणूक

1mg मधील गुंतवणुकीमुळे टाटा डिजिटलच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या प्रयत्नात वृद्धी होणार आहे. ई-फार्मसी कंपनीच्या अधिग्रहणामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यविषयक उत्पादनांची दर्जेदार सेवा देणे टाटा डिजिटलला शक्य होणार आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिक पाल यांनी म्हटले आहे. 

1mg चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत टंडन म्हणाले की देशातील सर्वात नामवंत आणि सन्माननीय उद्योगसमूहाबरोबर भागीदारी केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. 1mg कंपनीच्या आतापर्यतच्या वाटचालीतील हा एक मैलाचा दगड आहे.

टाटा डिजिटलचा विस्तार

1mg मधील टाटा समूहाची गुंतवणूक डिजिटल व्यवसायाच्या विस्ताराचेच पुढचे पाऊल आहे. ग्राहकांना सर्वच श्रेणीतील उत्पादने आणि सेवा एकाच व्यासपीठावर मिळाव्यात यासाठी टाटा डिजिटल प्रयत्नशील आहे. त्यामुळेच ई-डायग्नॉस्टिक्स, टेलिकन्सल्टेशन, ई-फार्मसी ही क्षेत्रे खूपच महत्त्वाची आहेत. देशातील ई-कॉमर्स व्यवसायात या क्षेत्रांचा खूप वेगाने विस्तार होतो आहे. कोरोना महामारीच्या काळात हेल्थकेअर सेवा पुरवण्यात या क्षेत्राने मोठी कामगिरी बजावली आहे, असे मत टाटा डिजिटलने व्यक्त केले आहे. 
देशातील ई-कॉमर्स क्षेत्रातील हेल्थकेअर श्रेणीचा व्यवसाय जवळपास १ अब्ज डॉलरचा आहे आणि त्यात दरवर्षी ५० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. टाटा डिजिटलच्या ई-कॉमर्स व्यवसायात या श्रेणीची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

क्युअरफिट टाटांच्या पंखाखाली

या आठवड्यात टाटा समूहात क्युअरफिट या बंगळूरूस्थित फिटनेस स्टार्टअपमध्ये ७.५ कोटी डॉलर गुंतवणूक करण्याचा करार केल्याची घोषणा केली होती. या करारानंतर क्युअरफीटचे संस्थापक मुकेश बन्सल हे टाटा डिजिटलमध्ये प्रेसिडेन्ट पदावर रुजू होणार आहेत. याबरोबर क्युअरफिटचे नेतृत्वदेखील बन्सल यांच्याकडे राहणार आहे. टाटा समूहाने 1mg चा ६५ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. त्यामुळे टाटा डिजिटल आता या ई-फार्मसी स्टार्टअपचे नवी मालक झाली आहे. टाटा डिजिटलने 1mg या स्टार्टअपमध्ये जवळपास १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 

1mg ही एक ई-फार्मसी कंपनी आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना औषधे, आरोग्य आणि वेलनेस उत्पादनांचा पुरवठा करते. याशिवाय कंपनी डायग्नॉस्टिक्स सेवा आणि टेलिकन्सल्टेशन सेवादेखील ग्राहकांना पुरवते. कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली होती. 1mg फार्मसीच्या तीन डायग्नोस्टिक्स लॅब आहेत. तर देशातील २०,००० पेक्षा जास्त पिन कोडवर कंपनी उत्पादने आणि सेवांचा पुरवठा करते. कंपनी बिझनेस टू बिझनेस डिस्ट्रिब्युशनचादेखील वापर करते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी