टाटा विरुद्ध अंबानी, रंगणार एक औद्योगिक संघर्ष

Tata vs Ambani super app battle टाटा समूह विरुद्ध मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह अशी औद्योगिक स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे.

Tata vs Ambani super app battle
टाटा विरुद्ध अंबानी, रंगणार एक औद्योगिक संघर्ष 

थोडं पण कामाचं

  • टाटा विरुद्ध अंबानी, रंगणार एक औद्योगिक संघर्ष
  • मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने फ्युचर समुहाचा रिटेल बिझनेस ताब्यात घेतला
  • टाटा समुहाने बिगबास्केट कंपनीतील ६३ टक्के मालकी हक्क ताब्यात घेतले

मुंबईः टाटा समूह विरुद्ध मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह अशी औद्योगिक स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेमुळे ग्राहकांना अनेक दर्जेदार वस्तू आणि सेवा वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. (Tata vs Ambani super app battle)

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने फ्युचर समुहाचा रिटेल बिझनेस ताब्यात घेतला आहे. पण या कराराला अॅमेझॉन कंपनीने हरकत घेतली आहे. सध्या या प्रकरणात कायदेशीर लढाई सुरू आहे. तसेच टाटा समुहाने बिगबास्केट कंपनीतील ६३ टक्के मालकी हक्क ताब्यात घेतले आहेत. या व्यवहाराला अद्याप भारताच्या व्यावसायिक प्रतिस्पर्धा आयोगाने मंजुरी दिलेली नाही. आयोगाने टाटा समुहाकडून कराराबाबत विशिष्ट तांत्रिक माहिती मागितली आहे. ही माहिती लवकरच पुरवू असे टाटा समुहाकडून सांगितले जात आहे.

टाटा समुहाच्या कराराला व्यावसायिक प्रतिस्पर्धा आयोगाची मंजुरी मिळाली तसेच रिलायन्स आणि अॅमेझॉन यांच्यातील कायदेशीर लढाईत रिलायन्सचा विजय झाला तर रिटेल उद्योगात टाटा समूह विरुद्ध मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह अशी व्यावसायिक स्पर्धा सुरू होईल.

टाटा समूह आणि रिलायन्स समूह दोघेही अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांची खरेदी घरबसल्या करण्याची संधी ग्राहकांना देणार आहेत. तसेच आपल्या मॉलच्या साखळीतूनही ग्राहकांना अनेक वस्तू आणि सेवा यांची थेट विक्री करणार आहे. यामुळे ही तुल्यबळ स्पर्धा होऊ शकते. यातून ग्राहकांना अनेक दर्जेदार वस्तू आणि सेवा वाजवी दरात उपलब्ध होतील, अशी शक्यता रिटेल इंडस्ट्रीतले अनुभवी व्यक्त करत आहेत. 

अलिकडेच फ्युचर समुहाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. फ्युचर समुहातील दोन लाख महिलांच्या नोकऱ्या अडचणीत आहेत. या नोकऱ्या वाचवण्यासाठी रिलायन्स आणि अॅमेझॉन यांच्यातील संघर्ष लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करण्याची विनंती महिलांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे. तर प्रतिस्पर्धा आयोगाची मंजुरी रखडल्यामुळे टाटा समुहाने उत्पादन आणि सेवांच्या विक्रीसाठी प्रस्तावीत सुपरअॅपच्या लाँचिंगची योजना दुसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. याआधी डिसेंबर २०२० पर्यंत सुपरअॅप लाँच करण्याची योजना होती. नंतर ३१ मार्च २०२१ पर्यंत सुपरअॅप लाँच करू असे सूतोवाच टाटा समुहाने केले होते. पण अद्याप प्रतिस्पर्धा आयोगाची बिगबास्केट सोबतच्या कराराला मंजुरी मिळालेली नाही. यामुळे सुपरअॅपचे लाँचिंग आणखी पुढे ढकलत असल्याचे संकेत टाटा समुहाकडून देण्यास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी