TCS Market Cap rises | मुंबई : टाटा समूहातील सर्वात महत्त्वाची आणि देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसच्या (TCS) शेअरने सोमवारी नवा उच्चांक गाठला. डिसेंबर तिमाहीचे चांगले निकाल आणि शेअर बायबॅकच्या बातम्यांमुळे (TCS Share Buyback) टीसीएसच्या शेअरची किंमत आज बीएसईवर १.८६ टक्क्यांनी वाढून ४,०४३ रुपयांच्या (TCS share price)सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. गेल्या तीन सत्रांमध्ये आयटी समभागात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टीसीएसचा एकत्रित निव्वळ नफा ९,७६९ कोटी रुपयांवर पोचला आहे. डिसेंबर २०२१ ला सरलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा १२.२ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने प्रति शेअर ७ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांशाची रेकॉर्ड डेट २० जानेवारी २०२२ आहे. पेमेंटची तारीख ७ फेब्रुवारी २०२२ आहे. (TCS to set record, market cap at all time high, nearer to Rs 15 lakhs crore)
कंपनीच्या संचालक मंडळाने १८,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक कार्यक्रमाचा प्रस्ताव ४,५०० रुपये प्रति शेअर या किंमतीने दिला आहे. कंपनी गुंतवणूकदारांकडून ४,५०० रुपये किंमतीने एकूण ४ कोटी शेअर्स खरेदी करेल. ही खरेदी निविदा मार्गाने केली जाणार आहे. टीसीएसची हा चौथा बायबॅक आहे. यापूर्वी २०१७, २०१८ आणि २०२० मध्ये देखील कंपनीने १६-१६ हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक केले आहेत.
समभागांच्या किमतीतील सध्याच्या तेजीसह, टीसीएस ही रु. १५ लाख कोटी मार्केट कॅप क्लबमध्ये प्रवेश करणारी दुसरी सूचीबद्ध कंपनी होणार आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजारमूल्य म्हणजे मार्केट कॅप १४.९५ लाख कोटी रुपये आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज १७.३० लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यानिशी पहिल्या स्थानावर आहे. तिसर्या तिमाहीचे निकाल आणि बायबॅकला मंजुरी मिळाल्यानंतर, टीसीएसच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानातील विस्ताराचा आणि वाढीचा (१५-२० टक्के) मोठा लाभ
टीसीएसला झाला आहे. युरोपमधील आउटसोर्सिंगमधील वाढ, विक्रेते एकत्रीकरण आणि डील पाइपलाइनमुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल १३ टक्के वार्षिक वृद्धीदराने (CAGR)वाढला आहे.
क्लाउड मॉडर्नायझेशन, कनेक्टेड एंटरप्राइझ आणि प्रोडक्ट इनोव्हेशन, ग्राहक अनुभव आणि डिजिटल वर्कप्लेस ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या महत्त्वाच्या थीमसह टीसीएच्या व्यवसायात सततवाढ होते आहे. आगामी काळात टीसीएसच्या शेअरच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.
डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत टीसीएसचा एकत्रित निव्वळ नफा १२.२ टक्क्यांनी वाढून ९,७६९ कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ८,७०१ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न १६.३ टक्क्यांनी वाढून ४८,८८५ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४२,०१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
तिसऱ्या तिमाहीत आयटी सेवांमधून नोकरी गमावण्याचे प्रमाण १५.३ टक्के होते. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत २८,२३८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यानंतर ३१ डिसेंबर २०२१ अखेर टीसीएसमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ५,५६,९८६ वर पोहोचली आहे.