Multibagger Stock : या ८ रुपयांच्या टाटांच्या शेअरने उडवली धमाल, एका महिन्यात गुंतवणुकदारांना दिला धुवॉंधार परतावा

Multibagger stock 2022: वर्षभरात शेअर बाजारात चढउतारही आले. मात्र एकूणच २०२१ हे वर्ष शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी कमाईचे ठरले. मागील वर्षी बाजारात आयपीओचीदेखील मोठी धूम होती. यातूनही कंपन्या आणि गुंतवणुकदारांनी तुफान कमाई केली आहे. टाटा समूहाच्या टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. (Tata Teleservices Maharashtra Ltd) या कंपनीने तर गुंतवणुकदारांना दणकून पैसा कमावून दिला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या पेनी स्टॉकने दिला बंपर परतावा
  • एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले २६ लाख रुपये
  • टाटा टेलीसर्व्हिसेसच्या छोट्या शेअरने वर्षभरात केले मालामाल

Multibagger stock 2022: मुंबई: सरलेल्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये शेअर बाजारात (Share Market) गुंतवणुकदारांनी तुफान कमाई केली. या काळात शेअर बाजारात चढउतारही आले. मात्र एकूणच २०२१ हे वर्ष शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी कमाईचे ठरले. मागील वर्षी बाजारात आयपीओचीदेखील मोठी धूम होती. यातूनही कंपन्या आणि गुंतवणुकदारांनी तुफान कमाई केली आहे. टाटा समूहाच्या टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. (Tata Teleservices Maharashtra Ltd) या कंपनीने तर गुंतवणुकदारांना दणकून पैसा कमावून दिला आहे. या शेअरची कामगिरी पाहूया. (The Multibagger stock of Tata Teleservices Maharashtra Ltd turned Rs 1 lakh into Rs 26 Lakhs in 1 year)

टाटा टेलीसर्व्हिसेसची कमाल

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. (Share of Tata Teleservices Maharashtra Ltd)या टाटा समूहातील कंपनीच्या शेअरने मागील एकाच महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या शेअरने मागील ६ महिन्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील एक वर्ष या शेअरने चांगलीच तेजी नोंदवली आहे. सध्या टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. चा शेअर २०६ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर एकच महिन्यापूर्वी म्हणजे २ डिसेंबर २०२१ला हा शेअर १२४ रुपये प्रति शेअर या किंमतीवर होता. एका महिन्यातच या शेअरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. गुंतवणुकदारांसाठी हा शेअर एक मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock)ठरला आहे. या पेनी स्टॉकमुळे दणकून कमाई झाली आहे.

वर्षभरात या शेअरने १ लाखाचे केले २६ लाख

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. च्या शेअरने मागील एका वर्षात तडाखेबंद घोडदौड केली आहे. हा शेअर ७.९० रुपयांच्या पातळीवर होता. तिथून तेजी नोंदवत हा शेअर आता २०६.३५ रुपये प्रति शेअर या पातळीवर पोचला आहे. वर्षभरात या शेअरने जवळपास २६ पट उसळी घेतली आहे. म्हणजे वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये जर कोणी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य २६ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. मागील वर्षी जुलै महिन्यात हा शेअर ५४ रुपयांच्या पातळीवर होता. सहा महिन्यांआधी गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास ४ लाख रुपये झाले आहे.

टाटा समूहाची कंपनी

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. ही टाटा समूहाचीच एक सहाय्यक कंपनी आहे. आपल्या क्षेत्रात या कंपनीचा दबदबा आहे. अलीकडेच टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने व्यवसायासाठीसाठीची देशातील पहिली स्मार्ट इंटरनेट लीज लाइनदेखील सुरू केली आहे. या सुविधेद्वारे कंपनी फारच कमी खर्चात हाय स्पीड इंटरनेट नेवटर्कची सुविधा व्यावसायिकांना आणि उद्योगांना उपलब्ध करून देते आहे. कंपनीच्या या उपक्रमाची खासियत म्हणजे याची क्लाउडवर आधारित सुरक्षा. यामुळे व्यवसायांचा डेटा सुरक्षित ठेवला जाणार आहे. त्यामुळे या व्यवसायात कंपनी चांगला महसूल कमावणार असून कंपनीचे बाजारातील स्थान भक्कम दिसते आहे.

गुंतवणुकदारांचा कल

मागील वर्षी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी