Federal Reserve : यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) 1994 नंतर कर्जाच्या व्याजदरात (interest rates) 0.75 टक्क्यांनी सर्वात मोठी वाढ जाहीर केली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने केलेली 28 वर्षांतील ही सर्वात मोठी व्याजदरवाढ आहे. फेडरल रिझर्व्हने महागाईवर (Inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, कारण अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकी फेडकडून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेत महागाईचा मागील 40 वर्षातला उच्चांक असून महागाई दर 8.6 टक्क्यांवर पोहचला आहे, अमेरिकेकडून देखील आर्थिक वाढीऐवजी महागाई दर नियंत्रणात आणण्याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. व्याजदर वाढल्याने डॉलर मजबूत होईल आणि रुपयाचे आणखी अवमूल्यन होण्याची शक्यता वाढेल. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाने आधीच 78.13 नीचांकी पातळी गाठली आहे. महागाई दराला 2 टक्क्यांपर्यंत आणण्याचं एफओएमसीचं उद्दिष्ट आहे, यावेळी मुख्य दरात वाढ पुन्हा सुरुच ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी परकीय चलन बाजारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया 78.22 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी येत्या काही महिन्यांतही व्याजदरात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.