Financial gift for dad : नवी दिल्ली : आज फादर्स डे (Father’s Day) आहे. या दिवशी आपल्या पित्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची संधी तुम्हाला आहे. आपल्या वडिलांना (Father)काहीतरी भेटवस्तू तुम्ही देणारच असाल. तुमच्या वडिलांना आवडेल अशी भेटवस्तू देण्याची तुमची इच्छा असेल. याबद्दल जाण्याचे अनेक पारंपारिक मार्ग आहेत परंतु जर तुम्हाला तुमच्या वडिलांना दीर्घकाळासाठी खरोखर मदत करणारी एखादी वस्तू भेट द्यायची असेल, तर तुम्ही आर्थिक भेटवस्तूचा (Financial gift) विचार केला पाहिजे. आपले वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, आपले राहणीमान, आपल्या गरजा, आपली हौसमौज पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर ते राबत असतात. अशावेळी या फादर्स डे, सर्वोत्तम आर्थिक भेटवस्तू देऊन त्याचे आभार का मानू नये. तुमच्या वडिलांना तुम्हाला कोणती आर्थिक वस्तू भेट देता येईल ते पाहूया. (This Father's Day give financial gift to your father)
बहुतेक मध्यमवर्गीय भारतीय पालक त्यांच्या निवृत्तीची योजना आखण्यात यशस्वी होतातच असे नाही. किंबहुना विविध कारणांमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. त्यातच बहुतांश पालक हे त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. मात्र आपल्या पालकांना गुंतवणुकीच्या सवयीची ओळख करून देण्यास अजूनही उशीर झालेला नाही. या फादर्स डे, तुम्ही त्याच्यासाठी म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (Mutual Fund SIP)गुंतवणूक सुरू करू शकता. हे त्यांच्यासाठी काही कालावधीत मोठी रक्कम निर्माण करण्यासाठी एक शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक धोरण तयार करेल. बहुतेक म्युच्युअल योजनांमधून तुम्ही हवे तेव्हा पैसे काढून घेऊ शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या वडिलांना निधी मिळू शकतो. एसआयपी तुमच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करू शकतात.
चांगला लाभांश देणार्या कंपन्यांचे शेअर्स हे आपल्या भांडवलाचे रक्षण करत कमाई करण्याचा उत्तम मार्ग आहे. सर्वसाधारणपणे ब्लू-चिप कंपन्या जास्त लाभांश देणार्या असल्याने, यातील बहुतांश शेअर्स गुंतवणुकीसाठी सुरक्षित असतात. तुम्ही वडिलांसाठी चांगला लाभांश देणारे शेअर्सदेखील खरेदी करू शकता. लाभांशाद्वारे तुमच्या वडिलांना मिळकतीचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी 5 टक्के आणि त्याहून अधिक लाभांश उत्पन्न असलेल्या कंपन्या शोधा. अशा प्रकारे तुम्ही वडिलांसाठी बोनस ते चांगला लाभांशाद्वारे एक कमाई निश्चित कराल.
अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी अलीकडेच त्यांचे व्याजदर वाढवले आहेत. आणि तुमचे वडील ज्येष्ठ नागरिक असल्यास, त्यांना मुदतठेवीवर (FD) अतिरिक्त 50 bps किंवा 0.5 टक्के व्याज मिळू शकते. मुदत ठेवी हा सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक आहे. सेवानिवृत्तीदरम्यान बहुतेक वडील त्यांचे भांडवल सुरक्षित ठेवण्यास आणि कालांतराने वाढवण्यास प्राधान्य देतात.
60 वर्षांवरील वडिलांसाठी, तुम्ही सुरक्षित, सरकारीद्वारे संचालित सेवानिवृत्ती लाभ कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (Senior Citizen’s Saving Scheme) गुंतवणूक सुरू करू शकता. या योजना निश्चित परतावा देतात आणि त्यांचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सध्या यावर व्याज दर 7.4 टक्के इतका आहे. हा व्याजदर बहुतेक बँका FD वर जो व्याजदर देत आहेत त्यापेक्षा जास्त आहे.
आणखी एक सरकार संचालित सेवानिवृत्ती लाभ योजना म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना. ही योजना सेवानिवृत्तांना नियमित उत्पन्न देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचा कालावधी 10 वर्षांचा आहे. ही योजना 10 वर्षांच्या शेवटी दरमहा खात्रीशीर परतावा देते आणि जमा केलेली मूळ रक्कम पॉलिसीधारकाला परत केली जाते.
आयुष्यभर आपल्यासाठी काटकसर करणाऱ्या, आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवणाऱ्या, आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आपल्या वडिलांना एखादी आर्थिक भेटवस्तू देऊन तुम्ही त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करत त्यांचे आयुष्य सुखकारक करू शकता.