Mutlibagger Stock in 2022 : मुंबई : शेअर बाजारासाठी सरणारे 2021-22 हे आर्थिक वर्ष चांगलेच ऐतिहासिक ठरले आहे. शेअर बाजारासाठी (Share Market) हे वर्ष दमदार होते. अनेकांनी या काळात शेअर बाजारात जबरदस्त कमाई केली. काही मल्टीबॅगर शेअर्सनी (Multibagger Stock)गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. आता लोक नवीन आर्थिक वर्षासाठी नवीन गुंतवणूक योजना बनवत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विक्रीचा जोर असला तरी देशांतर्गत शेअर बाजारासाठी हे आर्थिक वर्ष चांगले होते. या काळात काही समभागांनी मल्टीबॅगर परतावा देऊन गुंतवणुकदारांना श्रीमंत केले. यातील एक शेअर असा होता की ज्यांने काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपयांची कमाई करून दिली. हा शेअर म्हणजे कॉस्मो फेराइट्स (Cosmo Ferrites) या कंपनीचा मल्टीबॅगर शेअर. (This Multibagger stock turned investment of thousands into lakhs in one year)
अधिक वाचा : Multibagger Stock | अदानींच्या या शेअरने घातली आकाशाला गवसणी....27 रुपयांचा शेअर पोचला 2420 रुपयांवर
कॉस्मो फेराइट्स हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्सपैकी एक ठरला. या शेअरच्या किंमतीत तुफान वेगाने वाढ झाली. जर आपण आकडेवारी पाहिली तर 31 मार्च 2021 ला या कॉस्मो फेराइट्सच्या शेअरचे मूल्य फक्त 17.50 रुपये प्रति शेअर (Share price of Cosmo Ferrites) इतके होते. त्यात जबरदस्त तेजी येत ते 31 मार्च 2022 ला या शेअरची किंमत 609.30 रुपयांवर पोचली आहे. म्हणजेच एका वर्षात या शेअरने जवळपास 3,381 टक्क्यांची जबरदस्त झेप घेतली आहे.
मागील वर्षभरात एक्सप्रो इंडिया (Xpro India), ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिंग अॅंड असेम्ब्लीज (Automotive Stamping and Assemblies), अलोक्वांट फिनेटक (Alogquant Fintech), नॅशनल स्टॅडर्ड (National Standard), लॉइड्स मेटल्स अॅंड एनर्जी (Lloyds Metals and Energy) आणि टाटा टेलीसर्व्हिसेस (Tata Teleservices) यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सनी मुंबई शेअर बाजारात गेल्या 1 वर्षात 1000 टक्के ते 1,850 टक्के परतावा दिला आहे. पण कॉस्मो फेराइट्स (Cosmo Ferrites) या कंपनीने तर त्याहून तुफान कमाई गुंतवणुकदारांना करून दिली आहे. या शेअरची फारशी चर्चादेखील झाली नाही. ज्या गुंतवणुकदारांनी 1 वर्षापूर्वी कॉस्मो फेराइट्समध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या जवळपास 3.48 लाख रुपये झाले आहे.
भारतीय शेअर बाजाराला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जगभरातील मोठ्या गुंतवणुकदारांचे लक्ष भारतीय शेअर बाजाराकडे आहेच, मात्र त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणुकदारांचाही कल शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वाढत चालला आहे.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)