Twitter sues Elon Musk : फेक हँडल आणि स्पॅम हँडल यांची ठोस माहिती कंपनी देत नसल्याचे कारण पुढे करत एलॉन मस्क यांनी ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ४४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची योजना त्यांच्याकडून एकतर्फी रद्द केली. मस्क यांच्या या निर्णयाविरोधात ट्विटर कंपनीने कोर्टात दाद मागितली आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, टेस्ला कार आणि स्पेस एक्स या दोन बलाढ्य कंपन्यांचे मालक अशी ओळख मिरविणाऱ्या एलॉन मस्क यांना ट्विटर कंपनीने कोर्टात खेचले आहे. एलॉन मस्क यांनी ठरवून ट्विटर कंपनीची बाजारातील पत कमी करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक खेळी केली आहे. आधी एक ट्वीट करून ट्विटर कंपनी खरेदी करत असल्याचे एलॉन मस्क यांनी जाहीर केले. यानंतर व्यावसायिक पातळीवर चर्चा सुरू झाली. ४४ अब्ज डॉलरचा व्यवहार ठरला. यानंतर अचानक एक कारण देऊन मस्क यांनी व्यवहार रद्द केला. यामुळे ट्विटरच्या विश्वासार्हतेला धक्का लागला. कंपनीची बाजारातील पत कमी झाली. मस्क यांच्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. याची भरपाई होणे कठीण आहे त्यामुळे मस्क यांनी ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण करावा आणि तसे जर ते करणार नसतील तर कोर्टाने त्यांना तसा आदेश द्यावा; अशा स्वरुपाची मागणी करणारी याचिका ट्विटर कंपनीने कोर्टात सादर केली आहे.
अमेरिकेतील कायदेतज्ज्ञांच्या मते अशा स्वरुपाच्या वादांमध्ये काही काळानंतर न्यायाधीश खरेदीचा व्यवहार पूर्ण करा असाच आदेश देतात. या प्रकारात अनेकदा ज्या कंपनीची विक्री होणार असते त्यांच्या आधी ठरलेल्या विक्री मूल्यात मधल्या काळातील घडामोडींमुळे मोठी घसरण होण्याचा धोका असतो. ट्विटरच्या बाबतीत हाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले.
एप्रिल २०२२ मध्ये ट्विटरच्या एका शेअरची किंमत ५४.२० डॉलर होती जी आता ३४ ते ४० डॉलर दरम्यान फिरत आहे. ट्विटरविषयी उलटसुलट माहिती माध्यमांमध्ये आली तर तिचा खरेखोटेपणा नंतर तपासला जाईल पण आधी शेअर बाजारातील कंपनीच्या मूल्यावर वाईट परिणाम होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे ट्विटर आणि मस्क यांच्यातील वाद लवकर संपणे हेच ट्विटरच्या हिताचे असल्याचे मत अनेक कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.