कोरोना संकटामुळे उबरचे मुंबईतले ऑफिस बंद

Uber shuts down Mumbai office permanently 'उबर' कंपनीने मुंबईचे ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Uber shuts down Mumbai office permanently
कोरोना संकटामुळे उबरचे मुंबईतले ऑफिस बंद 

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकटामुळे उबरचे मुंबईतले ऑफिस बंद
  • मुंबईत ८२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत
  • 'उबर'च्या मुंबईतील कर्मचाऱ्यांचे भवितव्य संकटात

मुंबईः देशाची आर्थिक राजधानी अशी ख्याती मिरवणाऱ्या मुंबईतून मोठ्या कंपन्या आपली ऑफिस देशातील इतर शहरांमध्ये नेण्याची तयारी करत आहेत. 'कॅब ऑन डिमांड' ही 'अॅप बेस्ड टॅक्सी' सेवा देणाऱ्या 'उबर' (UBER) कंपनीने मुंबईचे ऑफिस बंद करण्याचा निर्णय (Uber shuts down Mumbai office permanently) घेतला आहे. भारतात उबरची मुंबई व्यतिरिक्त हैदराबाद (तेलंगणा), बंगळुरू (कर्नाटक) आणि गुरुग्राम (हरयाणा) या ठिकाणी ऑफिस आहेत. ही ऑफिस सुरू राहणार आहेत. 

मुंबईत ८२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत 

मुंबईत आतापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत आढळले आहेत. शहरात अद्याप २४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या आसपासच्या शहरांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मागील काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 'उबर' कंपनीने मुंबईतले ऑफिस बंद केल्याची चर्चा आहे.

'उबर'च्या मुंबईतील कर्मचाऱ्यांचे भवितव्य संकटात

'उबर' कंपनीचे मुंबई ऑफिस बंद झाल्यामुळे या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचे भवितव्य संकटात आहे. नेमक्या किती कर्मचाऱ्यांना मुंबईत वर्क फ्रॉम होम पर्याय देऊन कार्यरत ठेवणार आणि किती जणांना कामावरुन कमी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'उबर'चे मुंबई ऑफिस बंद होताच चर्चेला उधाण

कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागल्यामुळे मागील काही महिन्यांत 'उबर'च्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कंपनीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी 'उबर'च्या व्यवस्थापनाने जगभरातील ऑफिसांमधून कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागांमध्ये व्यवसाय कमी झाला आहे तसेच ज्या भागांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता जास्त आहे अशा भागांमध्ये प्राधान्याने कर्मचारी कपात सुरू आहे. भारतातल्या कर्मचारी कपातीचा अधिकृत निकष जाहीर झालेला नाही. मात्र आर्थिक राजधानी असूनही मुंबईतले ऑफिस बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे कोरोना संकट याचे मुख्य कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारी धोरणात संभ्रम

सध्या मुंबईत अनलॉक सुरू आहे. मात्र सरकारी धोरणात एकवाक्यता दिसत नाही अशी तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबईत अनलॉक जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी घरापासून २ किमी अंतरापेक्षा जास्त दूर जात असलेली अनेक वाहने अडवून दंडवसुली केली. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोना संकट वाढत आहे. अनलॉक जाहीर झाले तरी अनेक भागांमध्ये वारंवार खासगी आस्थापनांचा कारभार बंद केला जात आहे. पाऊस आणि कोरोना संकट अशा दुहेरी अडचणींमुळे मुंबईची पायाभूत व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतले कॉर्पोरेट क्षेत्र पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

'उबर'च्या कर्मचाऱ्यांना पत्र

'उबर' कंपनीचे सीईओ दारा खोसरोव्हशा यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात जगभरातील ४५ ऑफिस बंद करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार मुंबईतले ऑफिस बंद करत असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. कंपनी भारतात ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी