पैशाच्या गोष्टी : 'गोल्ड लोन' सोडवू शकते तुम्ही आर्थिक अडचण, मात्र या ६ बाबी समजून घ्या

काम-धंदा
Updated Apr 17, 2021 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

गोल्ड लोन तुम्हाला सहजरित्या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. सध्या बॅंका ७ टक्क्यांपर्यतच्या व्याजदराची ऑफर देत आहेत. मात्र गोल्ड लोन घेताना काही बाबींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

6 key aspects related to gold loan
गोल्ड लोनशी निगडीत महत्त्वाचे ६ मुद्दे 

थोडं पण कामाचं

  • सहजरित्या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध
  • कर्ज घेताना आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादींची आवश्यकता
  • क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नाही

नवी दिल्ली : पैशांची आवश्यकता असल्यास किंवा आर्थिक संकट आल्यास तुम्ही गोल्ड लोन नक्कीच घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला सहजरित्या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. सध्या बॅंका ७ टक्क्यांपर्यतच्या व्याजदराची ऑफर देत आहेत. मात्र गोल्ड लोन घेताना काही बाबींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. सोन्यावर कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला माहित असले पाहिजेत अशा ६ महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी समजून घेऊया.

गोल्ड लोनचा कालावधी


सर्वसाधारणपणे सोन्यावरील कर्जाची परतफेड करण्यासाठी २ ते ३ वर्षांच्या कालावधी लागतो. मात्र हे सोन्यावर कर्ज घेणारा ग्राहक आणि बॅंक किंवा एनबीएफसीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ एचडीएफसी बॅंकेत तीन महिन्यांपासून दोन वर्षांपर्यतच्या कालावधीसाठी कर्ज दिले जाते. तर स्टेट बॅंक ऑफ इंडिया तीन वर्षांपर्यतच्या कालावधीसाठी सोन्यावरील कर्ज देते. मुथूट आणि मनापुरम हे यापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज देतात.

जास्तीत जास्त किती गोल्ड लोन घेता येते


एक लाख रुपये मूल्याच्या सोन्यावर तुम्हाला ९०,००० रुपयांचे कर्ज मिळते. गुरूवारीच आरबीआयने याला वाढवून ९०,००० रुपये केले आहे. याआधी ही कमाल रक्कम ७५,००० रुपये इतकी होती. तर कमीत कमी १०,००० रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळू शकते. स्टेट बॅंक २० लाख रुपयांपर्यतचे कर्ज सोन्यावर देते. मुथूट फायनान्ससारख्या कंपन्या १,५०० रुपयांचेदेखील कर्ज सोन्यावर देतात. या कंपन्या फक्त गोल्ड लोनच देत असल्यामुळे या कंपन्यांमध्ये कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा नसते.

गोल्ड लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात


सर्वसाधारणपणे गोल्ड लोन घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादींची आवश्यकता असते. याशिवाय तुमच्या पत्त्याचे प्रूफ द्यावे लागते. काही वेळेस तुम्ही सोने विकत घेताना मिळालेले बिलसुद्धा दाखवावे लागते.

यामध्ये क्रेडिट स्कोअर पाहिला जातो का


गोल्ड लोन हे एक प्रकारचे सिक्युअर्ड लोन असते, त्यामुळे यामध्ये तुमच्या क्रेडिट स्कोअरचा प्रभाव नसतो. क्रेडिट स्कोअर न पाहताच तुम्हाला गोल्ड लोन मिळते. गोल्ड लोन हे पर्सनल लोनच्या तुलनेत अधिक सुलभरित्या आणि कमी व्याजदरावर उपलब्ध होत असते.

कर्जाची परतफेड


बॅंक किंवा एनबीएफसी तुम्हाला कर्जाच्या आणि व्याजाच्या परतफेडीसाठी अनेक पर्याय देतात. तुमच्या आवश्यकतेनुसार यातील कोणत्याही पर्यायाची निवड तुम्ही करू शकता. तुम्ही मासिक हफ्त्यांमध्ये परतफेड करू शकता. किंवा दर महिन्याला फक्त व्याज भरून कर्जाच्या मूळ रकमेची एकरकमी परतफेड करू शकता. याला बुलेट रिपेमेंट म्हणतात. यात बॅंक दरमहिन्याला व्याज घेते.

कर्जाची परतफेड न केल्यास तुमच्या सोन्याचे काय होईल


जर तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड करू शकला नाहीत तर कर्ज देणारी बॅंक किंवा कंपनी यांना तुमचे सोने विकण्याचा अधिकार आहे. याशिवाय जर सोन्याच्या भावात घसरण झाली तर कर्ज देणारी बॅंक तुम्हाला अतिरिक्त सोनेदेखील तारण ठेवण्यास सांगू शकते. जेव्हा तुम्हाला ठराविक कालावधीसाठीच पैशांची गरज असेल तेव्हाच गोल्ड लोन घेणे योग्य ठरते. घर खरेदी करणे किंवा मोठे कौटुंबिक खर्च यासाठी सोन्याचा वापर करणे योग्य ठरणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी