काय सांगता ! अच्छे दिन आले; भारतातील दारिद्र्याचे प्रमाण १२ टक्क्यांनी घटलं, शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं-वर्ल्ड बँकेचा अहवाल

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 18, 2022 | 17:07 IST

भारतातील (India) गरिबीबाबतचा एक संशोधन (research) अहवाल (report) नुकताच वर्ल्ड बँकेने (World Bank) जाहीर केला आहे. त्यानुसार मागील आठ वर्षात भारतातील गरिबीमध्ये (Poverty) मोठी घसरण झाली आहे.

 poverty in India has come down by 12%
poverty in India has come down by 12%  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • वर्ल्ड बँकेचा हा संशोधन अहवाल अर्थतज्ज्ञ सुतीर्थ सिन्हा रॉय आणि रॉय व्हॅनडर वेइड यांनी तयार केला आहे.
  • २०११ मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २२.५ टक्के होते ते २०१९ मध्ये १०.२ टक्के इतके खाली आले.
  • शहरी भागातील गरिबीचे प्रमाण ७.९ टक्क्यानी कमी झाले आहे.

नवी दिल्ली : भारतातील (India) गरिबीबाबतचा एक संशोधन (research) अहवाल (report) नुकताच वर्ल्ड बँकेने (World Bank) जाहीर केला आहे. त्यानुसार मागील आठ वर्षात भारतातील गरिबीमध्ये (Poverty) मोठी घसरण झाली आहे. याशिवाय अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या ८ वर्षांत ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे. भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २०११ ते २०१९ या आठ वर्षांत १२.३ टक्क्यांनी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०११ मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २२.५ टक्के होते ते २०१९ मध्ये १०.२ टक्के इतके खाली आले आहे. दरम्यान यापूर्वीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालात देखील भारतातील दारिद्र्य जवळपास संपुष्टात आल्याचा दावा करण्यात आला होता.

कोरोना संकट काळात गरिब आणि श्रीमंतांमधील आर्थिक विषमतेची दरी वाढत असल्याचे दिसून आले होते. मात्र त्या पूर्वीच्या आठ वर्षात भारतातील गरिबी कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रभावी अंमलबजावणी योजना राबवल्याने हा परिणाम दिसून आला आहे. वर्ल्ड बँकेच्या संशोधन अहवालानुसार वर्षात ग्रामीण भारतातील लोकांचे राहणीमान उंचावले आहे. ग्रामीण भारतात २०११ मध्ये गरिबीचे प्रमाण २६.३ टक्के इतके होते. ते २०१९ मध्ये १४.७ टक्के इतके खाली आले आहे. यात ११.६ टक्के घसरण झाली. याशिवाय शहरी भागातील गरिबीचे प्रमाण ७.९ टक्क्यानी कमी झाले आहे. वर्ल्ड बँकेच्या या अहवालानुसार शहरी भागात दारिद्र्याचे प्रमाण २०१९ मध्ये ६.३ टक्के इतके खाली आले.

मागील १० वर्षात भारतीयांचे जीवनमान उंचावल्याने गरिबी कमी झाली असली तरी अपेक्षेप्रमाणे त्यात तितकीसी घट झालेली नाही, असे महत्वाचे निरिक्षण वर्ल्ड बँकेच्या या अहवालात नोंदवले आहे. वर्ल्ड बँकेचा हा संशोधन अहवाल अर्थतज्ज्ञ सुतीर्थ सिन्हा रॉय आणि रॉय व्हॅनडर वेइड यांनी तयार केला आहे. आठ वर्षात गरिबी कमी होण्याबरोबरच अल्प भूधारक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असल्याचे अहवालात म्हटलं आहे. २०१३ ते २०१९ या या काळात केलेल्या सर्व्हेक्षणानुसार लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तब्बल १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मोठ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २ टक्के वाढ झाली आहे. भारतासाठी दारिद्र्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी महत्वाची मानली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी