What is Pi Day? Why do we celebrate Pi Day? : दरवर्षी 14 मार्च हा दिवस पाय दिवस किंवा पाय दिन (Pi Day) म्हणून साजरा करतात. यंदा मंगळवार 14 मार्च 2023 रोजी पाय दिवस (pi = 3.14159) आहे. पाय दिवस गणितातील पाय अर्थात स्थिरांकासाठी साजरा करतात. एका गणिती संकल्पनेच्या सन्मानासाठी विशेष दिवस साजरा करण्याची ही आगळी प्रथा गणित लोकप्रिय करण्यास उपयुक्त आहे.
पाय या या स्थिरांकातले 3, 1, 4 हे पहिले तीन आकडे महत्त्वाचे आहेत. याच कारणामुळे प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या महिन्यातील 14 तारखेला म्हणजेच 14 मार्चला (महिना/दिवस दुसऱ्या शब्दात 3/14) पाय दिवस साजरा करतात.
पाय (π) हा स्थिरांक वर्तुळाच्या परीघ आणि व्यास यांच्या लांबीचे गुणोत्तर आहे. या स्थिरांकाचे मूल्य 3.141592654 आहे. गणनाच्या (calculation) सोयीकरिता पायचे मूल्य 22/7 किंवा 355/113 असे धरतात.
पाय हा गणितातील एक महत्त्वाचा स्थिरांक आहे. विज्ञानाच्या बऱ्याच शाखांमध्ये पायचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अपरिमेय संख्या म्हणून पायला (π) सामान्य अपूर्णांक म्हणून व्यक्त करता येत नाही. पायचे दशांस रूप कधीही संपत नाही आणि त्यामध्ये पुनरावृत्ती पण होत नाही.
भौतिक शास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियममध्ये (विज्ञान संग्राहालय) पाय दिवसाचे आयोजन केले होते. यानंतर युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने अमेरिकेत 2009 मध्ये 14 मार्च हा राष्ट्रीय पाय डे (पाय दिवस) म्हणून साजरा करण्याचा ठराव केला. नंतर युनेस्कोच्या (UNESCO) 40व्या सर्वसाधारण परिषदेने नोव्हेंबर 2019 मध्ये पाय दिवस हा आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून जाहीर केला. गूगलने 2010 मध्ये पाय डे साठी गूगल डूडल सादर केले.
पाय डे अर्थात 14 मार्च हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्मदिन आहे.
जगभर 14 मार्च हा दिवस पाय दिवस म्हणून साजरा करतात. तर 22 जुलै हा दिवस पाय निकटन दिवस किंवा पाय निकटन दिन (पाय अॅप्रॉक्झिमेशन डे) म्हणून साजरा करतात. कारण पायचे मूल्य 22/7 आहे.
या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?