Cryptocurrency | बिटकॉइन १ लाख डॉलरपर्यत पोचेल का? पाहा अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम...

Bitcoin Rise : बिटकॉइनच्या किंमतीवर सर्वचजण लक्ष ठेवून आहे. सरलेल्या वर्षात बिटकॉइनने मोठी घसरण नोंदवली मात्र आगामी काळात बिटकॉइनचे मूल्य झपाट्याने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. अर्थात अनेक घटकांवर बिटकॉइनच्या किंमतीची घोडदौड अवलंबून असणार आहे. बिटकॉइन वर्षभरात १ लाख डॉलरचा टप्पा ओलांडेल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Bitcoin may reach at $1 Lakh
बिटकॉइन १ लाख डॉलरचा टप्पा गाठण्याची शक्यता 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनचा मागील काही कालावधीत जोरदार विस्तार
  • वर्षभरात बिटकॉइन १ लाख डॉलरवर पोचण्याचा अंदाज
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर बरेच काही अवलंबून

Bitcoin Outlook 2022 : नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency)वेगाने विस्तार होतो आहे आणि त्यातही बिटकॉइनच्या (Bitcoin) नावाची जगभर चर्चा होते आहे. बिटकॉइनच्या किंमतीवर सर्वचजण लक्ष ठेवून आहे. सरलेल्या वर्षात बिटकॉइनने मोठी घसरण नोंदवली मात्र आगामी काळात बिटकॉइनचे मूल्य झपाट्याने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. अर्थात अनेक घटकांवर बिटकॉइनच्या किंमतीची घोडदौड अवलंबून असणार आहे. बिटकॉइन वर्षभरात १ लाख डॉलरचा टप्पा ओलांडेल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) धोरणांचा बिटकॉइनवर मोठा परिणाम होत असतो. (Will Bitcoin reach $1 Lakh mark, difficult times ahead as US Federal reserve working on bond tapering)

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण

यूएस फेडरल रिझर्व्ह या वर्षी ऍक्सेस लिक्विडिटी सुलभ करण्यासाठी बॉन्ड टॅपरिंग प्रोग्राम सुरू करत आहे. टॅपरिंग प्रोग्राम अंतर्गत, ते हळूहळू कर्जरोखे किंवा बॉंड्सची खरेदी कमी करतील आणि आगामी काळात व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटवर फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. बिटकॉइन सध्या ४१,००० डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. जानेवारी महिन्यात बिटकॉइनचे मार्केट कॅप आतापर्यंत ८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे. अशा स्थितीत बिटकॉइन १ लाख डॉलरवर जाण्याच्या शक्यतेवर ढग दाटू लागले आहेत. क्रिप्टो मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बिटकॉइन निश्चितपणे हा टप्पा गाठेल, फक्त जागतिक घटकांमुळे त्यात विलंब होईल.

बिटकॉइनने गाठली होती ६५ हजार डॉलर पातळी

कोरोनाच्या काळात बिटकॉइन ६५ हजार डॉलर्सच्या पुढे पोहोचले होते, तो आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक आहे. सध्याच्या पातळीपासून १ लाख डॉलरपर्यत पोहोचण्यासाठी बिटकॉइनमध्ये १३० टक्क्यांहून अधिक तेजी येणे आवश्यक आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर आपण इतिहास पाहिला तर, बिटकॉइनने वार्षिक आधारावर अनेक वेळा तिप्पट आकड्यांमध्ये परतावा दिला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तिहेरी अंकी वाढ होणे फार कठीण आहे. फेडरलच्या निर्णयाचा थेट परिणाम त्याच्या किमतीवर होईल.

नोटा मोठ्या प्रमाणावर छापल्या गेल्या

मिलर तबकचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट मॅट मॅले यांनी सांगितले की, कोरोनामुळे यूएस फेडरल तसेच जगभरातील सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्या. क्रिप्टोकरन्सी वाढण्याचे हे मुख्य कारण होते. आता फेडरल रिझर्व्ह बाँड टॅपरिंगच्या दिशेने काम करत आहे, त्याचा किंमतीवर परिणाम निश्चित आहे.

व्याजदर वाढल्यास अडचणीत वाढ

जेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते, तेव्हा गुंतवणूकदारांसाठी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गुंतवणुकीची जोखीम स्वीकारणे अधिक जोखमीचे असेल. या गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत भरपूर कमाई केली आहे. अशा परिस्थितीत, ते त्यांची क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक विकून सुरक्षित गुंतवणुकीच्या मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे.

बिटकॉइन १ लाख डॉलरपर्यंत पोचू शकतो

गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक झॅक पांडल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, जर क्रिप्टोकरन्सीने सोन्याच्या बाजारपेठेत अशाच प्रकारे वर्चस्व गाजवले तर बिटकॉइन १  लाख डॉलरचा टप्पा सहज पार करू शकेल. आर्थिक तज्ञ सल्ला देत आहेत की जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये क्रिप्टोकरन्सी समाविष्ट केल्या असतील, तर तुमचा पोर्टफोलिओ संतुलित करा. क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रचंड जोखीम आहे त्यामुळे त्याचे एकूण प्रमाण तुमच्या पोर्टफोलिओ जास्त असता कामा नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी