Global economy | जागतिक अर्थव्यवस्था २०२२ मध्ये होणार १०० ट्रिलियन डॉलरची, फ्रान्सला मागे टाकणार भारत

Indian Economy | जागतिक अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेचाही विस्तार होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठी होत पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था २०२३ मध्ये इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Global economy
जागतिक अर्थव्यवस्थेचा विस्तार 
थोडं पण कामाचं
  • जगाची अर्थव्यवस्था पुढील वर्षी १०० ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडणार
  • भारतीय अर्थव्यवस्था पुढे सरसावणार, इंग्लंड आणि फ्रान्सला मागे टाकणार
  • जागतिक अर्थव्यवस्थेसमोर महागाई आणि मंदीचे आव्हान

World's economic output : नवी दिल्ली: जगाची एकूण अर्थव्यवस्था (World economy) पुढील वर्षी पहिल्यांदाच १०० ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडणार आहे. अमेरिकेला (USA) मागे टाकून जगातील  नंबर वन अर्थव्यवस्था बनण्यासाठी चीनला (China)अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार आहे. चीन २०३० मध्ये जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. याआधी चीन २०२८ मध्ये जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Biggest economy in world) बनण्याचा अंदाज मागील वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबलच्या अहवालात मांडण्यात आला आहे. आता ब्रिटिश कन्सल्टन्सीने सादर केलेल्या  नव्या अहवालात पुढील दशकाचे चित्र मांडण्यात आले आहे. (World economy will cross $100 trillion mark in 2022, India will overtake France)

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ

जागतिक अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेचाही विस्तार होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठी होत पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था २०२३ मध्ये इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. इंग्लंडला मागे टाकून भारत कोरोना संकटाआधीचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान पटकावणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतसमोर महागाई आणि मंदीचे संकट

चालू दशकात जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान महागाईला हाताळण्याचे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आहे. अमेरिकेत सध्या महागाईदर ६.८ टक्क्यांवर पोचला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील काही योग्य पावले महागाई आणि इतर अनियमित घटकांना नियंत्रणात ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. जर जगाने आणि जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांनी महागाईसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना योग्य पद्धतीने हाताळले नाही तर जगाला २०२३ किंवा २०२४ मध्ये मोठ्या मंदीला सामोरे जावे लागेल असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात म्हटले आहे की जर्मनीच्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येत वेग पकडत आहे. २०३३ पर्यत जर्मनीची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत पुढे निघून जाणार आहे. तर रशिया देखील २०३६ पर्यत जगातील टॉप १० अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होणार आहे. इंडोनेशियाची अर्थव्यवस्था २०३४ पर्यत नवव्या स्थानावर पोचणार आहे.

कोरोनाच्या संकटातून सावरताना

कोरोना महामारीच्या संकटकाळात २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला होता. भारतीय अर्थव्यवस्थेला देखील याचा मोठा दणका बसला होता. मात्र आता जगाबरोबरच भारताची अर्थव्यवस्थादेखील रुळावर येते आहे. अर्थव्यवस्था वेग पकडत आहेत. आगामी काळात चीनची अर्थव्यवस्था नंबर वन बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. चीन, जपान आणि भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थांमुळे आगामी काळात आशियाचे वर्चस्व जागतिक अर्थव्यवस्थेवर राहणार आहे. अर्थात सध्या मात्र महागाई आणि मंदी ही दोन संकटे समोर उभी आहेत. कोरोनाच्या संकटाला तोंड देत भारताने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणली आहे. आता उद्योगधंदे वेग घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी