Yes Bank: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीची धाड, बँकेच्या बाहेर लांब रांगा

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Mar 07, 2020 | 11:29 IST

आज रात्री येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतल्या समुद्र महल घरावर ईडीच्या सहा सदस्यांच्या टीमनं छापा टाकला. येस बँकेवर सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Yes Bank
Yes Bank: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीची धाड, बँकेच्या बाहेर लांब रांगा 

मुंबईः येस' बँक सध्या अडचणीत आहे. येस बँकेवर  सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.  आज रात्री येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतल्या समुद्र महल घरावर ईडीच्या सहा सदस्यांच्या टीमनं छापा टाकला.  डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सध्या त्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली. तसंच राणा कपूर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. राणा कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. 

डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप यांच्यावर करण्यात आला आहे. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.  राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन  हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केलं आहे.  आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचं समोर आलं आहे. 

राणा कपूर यांच्या घरातील एका व्यक्तीच्या खात्यात वेळो वेळी मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती देखील ईडीला सूत्रांनी दिली. येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. खातेदारांना महिना भरात फक्त 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचा परिणाम येस बँकेत पाहायला मिळतोय. ठाणे, भिवंडी, पुणे तसंच राज्यभरातील येस बँकेच्या इतर शाखांमध्ये खातेदारांनी गर्दी केली आहे. 

वरळीच्या समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचा प्लॅट आहे. या बिल्डिंगमध्ये देशातील अनेक व्यावसायिक, मोठ्या कंपन्यांचे सीईओ राहतात.  देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक भारतीय स्टेट बँक येस बँकेत मोठी गुंतवणूक करणार, असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री ​निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी