RBI Monetary Policy June 2022: देशातील महागाई (Inflation) कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) शक्य ते प्रयत्न करत आहेत. केंद्रीय बँक (Central bank) 8 जून 2022 रोजी आगामी आर्थिक धोरण आढाव्यात (MPC) धोरण दरांमध्ये आणखी एक वाढ जाहीर करू शकते. आरबीआयचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी यापूर्वीच तसे संकेत दिले आहेत. या महिन्यात रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. गव्हर्नर दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू झाली असून बुधवारी बैठक झाल्यानंतर घेतलेले निर्णय गव्हर्नर जाहीर करतील.
किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये सलग सातव्या महिन्यात वाढून 7.79 टक्क्यांच्या आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनासह वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण आहे.
घाऊक किमतींवर आधारित महागाई 13 महिन्यांपासून दुहेरी अंकात राहिली आणि एप्रिलमध्ये 15.08 टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. दास यांनी नुकत्याच दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, "रेपो दरांमध्ये काही वाढ होणार आहे, परंतु ते किती असेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही.
बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी एमपीसीच्या बैठकीत सांगितले की, वाढ आणि चलनवाढीच्या मध्यवर्ती बँकेच्या दृष्टीकोनातून हा आढावा महत्त्वाचा आहे.
"रेपो रेटमध्ये वाढ होईल, परंतु तो 0.25-0.35 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही कारण MPC रेपो दरात मोठ्या वाढीच्या बाजूने नाही, असे मे महिन्यात झालेल्या बैठकीच्या टिपण्णीत सूचित केले होते." असे ते म्हणाले होते. पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कात कपात, काही खाद्यतेलांवरील आयात शुल्कात कपात आणि गव्हाच्या निर्यातीवर बंदी यांसह महागाई नियंत्रणासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
बीओएफए सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे की आरबीआय जूनमध्ये रेपो दरात 0.40 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.35 टक्के वाढ करेल अशी अपेक्षा आहे. Housing.com, PropTiger.com आणि Makaan.com चे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यांनी असेही म्हटले की, दर वाढ हळूहळू असावी, कारण त्याचा रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.