Agniveer Recruitment : भारतीय सैन्य दलाकडून (Indian Amry) भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणार असून यामध्ये शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. त्यासाठी लेखी प्रवेश परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मानसिक स्वास्थ आणि शारीरिक स्वास्थ यांचा योग्य समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने (Indian Army) भरती प्रक्रियेत बदल केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (22 फेब्रुवारी) यासंदर्भात माहिती दिली असून या बदलाद्वारे मानसिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येईल.
भारतील लष्करातील भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी या बदलाविषयी अधिकची माहिती दिली. कर्नल सुरेश यांनी सांगितले की, सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. मात्र आता लेखी परीक्षा ही भरती प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे महत्त्वाचं असणार आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल.
कर्नल सुरेश यांनी पुढे माहिती दिली की, भरती प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्य देणार आहे. तर उमेदवाराला फक्त 250 रुपये भरावे लागतील.
अग्निवीर म्हणून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी वर्षातून एकदाच ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. त्यापूर्वी अर्ज दाखल करावा. सुधारित भरती प्रक्रियेनुसार, भरतीपूर्वी संगणकावर आधारित ऑनलाइन कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) घेतली जाईल. अग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई (CEE), शारीरिक चाचणी (Physical Test) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेण्यात येईल.