अॅमॅझॉन इंडियामध्ये २० हजार जणांना नोकरीची संधी

Amazon India to hire 20000 temporary staff ई-कॉमर्स सेवा देणारी अॅमॅझॉन इंडिया ही कंपनी भारतात २० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनी हंगामी तत्वावर कर्मचारी भरती करणार आहे. 

Amazon India to hire 20000 temporary staff
अॅमॅझॉन  

थोडं पण कामाचं

  • अॅमॅझॉन इंडियामध्ये २० हजार जणांना नोकरीची संधी
  • 'कस्टमर सर्व्हिस' विभागासाठी भरती, १२वी उत्तीर्ण तरुणांना मिळणार रोजगाराची संधी
  • गोदाम विभागातील ५० हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली: भारतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. ई-कॉमर्स सेवा देणारी अॅमॅझॉन इंडिया (Amazon India) ही कंपनी भारतात २० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनी हंगामी तत्वावर कर्मचारी भरती करणार आहे. 

कोरोना संकटामुळे भारतात शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद आहेत. मात्र ऑनलाइन शॉपिंगला परवानगी आहे. देशात ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे ई-कॉमर्स क्षेत्रातल्या अॅमॅझॉन इंडिया या बलाढ्य कंपनीने भारतात हंगामी तत्वावर कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सहा महिन्यांसाठी हैदराबाद, पुणे, कोइम्बतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदिगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ, लखनौ या शहरांमध्ये कर्मचारी भरती करणार आहे. 

हंगामी तत्वावर घेतलेले नवे २० हजार कर्मचारी हे ठिकठिकाणी वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरुनच 'कस्टमर सर्व्हिस' विभाग हाताळतील. ग्राहकांच्या तक्रारी, ग्राहकांकडून होणारी चौकशी ही कामं नवे कर्मचारी हाताळतील. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. कंपनीच्यावतीने ग्राहकांशी इ मेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोनद्वारे संवाद साधण्याचे काम नवे कर्मचारी करतील. 

१२वी उत्तीर्ण तरुणांना मिळणार रोजगाराची संधी

१२ वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी, हिंदी आणि ज्या राज्यात काम करायचे आहे तिथल्या स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना कर्मचारी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. कंपनी सध्या सतत परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार नवी भरती प्रक्रिया सुरू करत आहे. 

'कस्टमर सर्व्हिस' विभागासाठी भरती

ऑनलाइन शॉपिंग वाढू लागल्यामुळे ग्राहकांच्या शंका, त्यांचे प्रश्न, तक्रारी यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. हे विषय तातडीने हाताळणे आवश्यक असल्यामुळे अॅमॅझॉन इंडिया कंपनीने 'कस्टमर सर्व्हिस' विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

गोदाम विभागातील ५० हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू

कोरोना संकटामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. घरखर्च चालवण्यासाठी पैशांची गरज असते पण नोकरी नसल्यामुळे अनेक तरुणांचे आर्थिक प्रश्न गंभीर झाले आहेत. यातील किमान काही जणांना अॅमॅझॉन इंडियाच्या पर्यायामुळे दिलासा मिळणार आहे. याआधी मे महिन्यात कंपनीने गोदाम विभागासाठी भारतात ५० हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करत असल्याचे जाहीर केले होते.

लवकरच वेगवेगळ्या विभागांसाठी कर्मचारी भरती करणार

लवकरच वेगवेगळ्या विभागांसाठी कर्मचारी भरती करणार असल्याचे संकेत अॅमॅझॉन इंडियाने दिले आहेत. कंपनीने भारतात विस्तारासाठी पाच वर्षांची योजना तयार केली आहे. या योजनेनुसार मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. 

अॅमझॉन इंडिया कंपनीमुळे ७ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

अॅमझॉन इंडिया कंपनीमुळे आतापर्यंत भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ७ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे. विस्तार करुन कंपनी देशात आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी