Mahajobs Portal: राज्यातील तरुणांसाठी महाजॉब्स पोर्टल लॉन्च, अवघ्या चार तासात १३ हजार नोंदणी

Mahajobs portal launch: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पुढाकारातून “महाजॉब्स” (http://mahajobs.maharashtra.gov.in) हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले.

mahajobs portal
महाजॉब्स पोर्टल लॉन्च (फोटो सौजन्य:mahajobs.maharashtra.gov.in) 

थोडं पण कामाचं

  • राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी
  • राज्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी मोबाईलवर “महाजॉब्स” संकेतस्थळ लॉन्च
  • http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार

Mahajobs portal: राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी (Job Opportunity) उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पुढाकारातून “महाजॉब्स” (http://mahajobs.maharashtra.gov.in) हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यंनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर “महाजॉब्स” नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली.

काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे

मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करतांना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असेही ते म्हणाले.

भूमिपुत्रांनाच नोकरीची संधी

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत ५० हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल.

चार तासांत १३ हजारांहून अधिक नोंदणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली. 

संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे.  http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहे. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरूणांना आणि उद्योजकांना होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी