Maharashtra Mega Bharti: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार थेट सेवा कोट्यातील 75 हजार पदांची मेगा भरती करणार आहे. ही पदे 15 ऑगस्टपूर्वी भरण्यात येणार असून सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील 18 हजार 939 पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक व अभियांत्रिकी महाविद्यालयांची संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे. ही ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस आणि टीसीएस या खासगी कंपन्या घेणार आहेत.
10 एप्रिल रोजी का वृत्तपत्राने 'पावने तीन लाख जागा रिक्त, पण मेगा भरती नाही' या शीर्षकाखाली राज्यातील बेरोजगारीवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर 12 एप्रिल रोजी ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश जारी केले. 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार, 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये थेट सेवा भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.
अधिक वाचा: Anna Hazare : केजरीवाल दोषी असतील तर शिक्षा झाली पाहिजे : अण्णा हजारे
तसेच, मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार, यापूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षेला बसू शकणार, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, 'IBPS' उमेदवारांसाठी 'अॅप्लिकेशन पोर्टल' विकसित करत आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या भरतीच्या जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता यांची सविस्तर माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदूनामावली अंतिम करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. 21 नोव्हेंबर 2022 च्या सामान्य प्रशासनाच्या निर्णयानुसार, ही परीक्षा खाजगी कंपन्या 'IBPS' आणि 'TCS' द्वारे ऑनलाइन घेतली जाईल. 'आयबीपीएस' कंपनीने सामंजस्य करार (MOU) करून संबंधित जिल्हा परिषदेचे कार्यालय, सर्व नोडल अधिकारी आणि उपायुक्त, विभागीय आयुक्त यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले आहे. या आदेशानुसार 21 एप्रिलपर्यंत सामंजस्य करारावर स्वाक्षरी जिल्हा परिषद स्तरावर करण्यात यावी, असेही ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा: Special Block on Central Railway : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त नियमावली तयार करून पदभरतीबाबत शासनाने केलेली कार्यवाही, जिल्हा परिषदांकडून सुरू असलेली कार्यवाही आणि पदभरतीची सद्यस्थिती याबाबत सर्वांना माहिती द्यावी, असे आदेशात सांगण्यात आले आहे. आगामी परीक्षेसाठीचा 'कृती आराखडा' सर्वांना दिसेल अशा ठिकाणी पोस्ट करावा. उमेदवारांना भरतीशी संबंधित काही माहिती किंवा शंका असल्यास त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. परीक्षा पूर्ण होऊन उमेदवारांची नियुक्ती होईपर्यंत ही हेल्पलाइन सुरू ठेवावी, असे आदेशही ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.