...म्हणून बदलतोय नोकऱ्यांचा ट्रेंड

जॉब पाहिजे
Updated May 20, 2020 | 18:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना संकटामुळे देशातील नोकऱ्यांचा ट्रेंड बदलण्यास सुरुवात झाली आहे.

new job trend
बदलतोय नोकऱ्यांचा ट्रेंड  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकटामुळे देशातील नोकऱ्यांचा ट्रेंड बदलण्यास सुरुवात
  • वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार
  • अनेक नोकऱ्यांमध्ये ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम असे दोन्ही पर्याय उपलब्ध होणार

मुंबईः कोरोना संकटामुळे देशातील नोकऱ्यांचा ट्रेंड बदलण्यास सुरुवात झाली आहे. जॉब पोर्टल आणि नोकऱ्या पुरवणाऱ्या एजन्सी यांनी या ट्रेंडची दखल घेतली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी ट्रेंड समजून घेऊन पूर्ण तयारी करुन प्रयत्न केल्यास त्यांना लवकर संधी मिळू शकते, असे जॉब पोर्टलचे अधिकारी सांगत आहेत. 

देशात पुढील काही वर्षे मॅन्युफॅक्चरिंग (निर्मिती क्षेत्र/उत्पादन क्षेत्र) आणि सेवा क्षेत्र या दोन प्रकारांमध्ये सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतील. सेवा क्षेत्रातील आयटी बेस्ड असेल्ल्या मर्यादीत नोकऱ्यांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' हा पर्याय असेल मात्र इतर सेवा क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहावे लागेल. 

कम्प्युटरच्या मदतीने डिझायनिंग, एडिटिंग, आकडेमोड, कंटेंट निर्मिती, प्रोग्रॅमिंग, गेम डिझायनिंग अशा स्वरुपाची कामं करणाऱ्यांसाठी तसेच या कामाची तपासणी करणाऱ्यांसाठी ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम हे पर्याय उपलब्ध असतील. सर्व प्रकारच्या कॉल सेंटरच्या नोकऱ्यांमध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नोकऱ्यांमध्ये मर्यादीत प्रमाणात ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील, असे नव्या ट्रेंडमधून स्पष्ट होत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा, क्लाउड प्रोग्रॅमिंग या क्षेत्रातील नोकऱ्यांना महत्त्व येईल. या क्षेत्रातील निवडक तज्ज्ञांचा पगार वाढेल, असा अंदाज जॉब पोर्टल आणि नोकऱ्या पुरवणाऱ्या एजन्सी यांनी व्यक्त केला आहे. वर्क फ्रॉम होमच्या पर्यायामुळे देशातील महिला वर्गाला नोकऱ्या मिळण्याची संधी वाढेल, असाही अंदाज जॉब पोर्टल आणि नोकऱ्या पुरवणाऱ्या एजन्सी यांनी व्यक्त केला आहे. 

कॅब सर्व्हिस, ई-कॉमर्स कंपन्या, कुरिअर कंपन्या आणि फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या तसेच हॉटेल, रेस्टॉरंट अशा प्रकारच्या मर्यादीत कौशल्याधारित नोकऱ्यांच्या क्षेत्रात परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर आणखी नोकऱ्या निर्माण होतील. पण पगाराची कपात होण्याची शक्यता आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्येही मर्यादीत कौशल्याधारित नोकऱ्यांच्या क्षेत्रात नोकऱ्या  वाढतील आणि पगारात घट होईल, असा ट्रेंड दिसत आहे. ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय, वेटर अशा स्वरुपाच्या कामांमध्ये मर्यादीत कौशल्य आणि भरपूर कष्ट असे कामाचे स्वरुप असते. त्यामुळे या नोकऱ्या वाढल्या तरी त्यांच्या किमान पगारात घट होण्याची शक्यता आहे.  

बँक, विमा, गुंतवणुकीचे पर्याय पुरवणाऱ्या कंपन्या, मनुष्यबळ विभाग, प्रशासन, सरकारी अधिकारी-कर्मचारी अशांच्या नोकऱ्यांमध्ये पुढील १-२ वर्षात मोठी उलथापलथ होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रांत मर्यादीत मनुष्यबळाच्या जोरावर काम करणे शक्य होणार आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय समाजात लोकप्रिय असलेल्या या नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही ठिकाणी तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जातील त्याचवेळी नव्या कारखान्यांच्या आगमनामुळे नोकऱ्या निर्माण होण्याचीही शक्यता आहे. पण या नोकऱ्यांसाठी संबंधित कौशल्य शिकून घ्यावे लागेल. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या मर्यादीत कौशल्याच्या जोरावर सुरक्षित नोकरी आणि उत्तम पगाराचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे जॉब पोर्टल आणि नोकऱ्या पुरवणाऱ्या एजन्सी यांचे म्हणणे आहे. 

कोरोना संकटामुळे टार्गेट बेस्ड कामांमध्ये तसेच विशिष्ट तासांच्या कंत्राटी कामांमध्ये वाढ होण्याचा अंदाज जॉब पोर्टल आणि नोकऱ्या पुरवणाऱ्या एजन्सी यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य सेवा, ऑनलाईन शिक्षण या क्षेत्रात रोजगार निर्माण होतील, असा ट्रेंड दिसत आहे. 

भारतात महिलांच्या तुलनेत नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. देशातील सांस्कृतिक व्यवस्था हे या मागचे मोठे कारण आहे. सध्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त नोकऱ्या पुरुषांच्या ताब्यात आहेत. कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदांवर असलेल्या पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पण कोरोना संकटामुळे परिस्थिती हळू हळू बदलणार आहे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत पुढील २ वर्षात वाढ होण्याची शक्यता आहे. वर्क फ्रॉम होम हा पर्याय महिलांसाठी सोयीचा ठरणार असल्याचा ट्रेंड दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी