सोशल मीडियाचा वापर करून जॉब कसा मिळवाल

जॉब पाहिजे
Updated Apr 18, 2021 | 18:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. त्याचा वापर आता व्यावसायिक कामांसाठी होऊ लागला आहे. सोशल मीडियाचा वापर करून जॉब कसा मिळवायचा ते पाहूया

Smart use of Social media to get job
सोशल मीडियाचा वापर करून जॉब कसा मिळवावा 

थोडं पण कामाचं

  • सोशल मीडियाचा प्रभावी वापर
  • कसे तयार करावे नेटवर्क
  • नेमके काय पोस्ट करावे

नवी दिल्ली : सोशल मीडिया अस्तित्वात आल्यानंतर सुरूवातीच्या काळात त्याचा वापर मनोरंजनासाठीच होत होता. आता मात्र सोशल मीडिया अनेक क्षेत्रात विस्तारला आहे. व्यावसायिक कामांसाठी सोशल मीडियाचा वापर सर्रास सुरू झाला आहे. करियर किंवा नोकरी मिळवण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर होतो आहे. जर योग्य पद्धतीने सोशल मीडियाचा वापर केला तर तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी किंवा करियरमध्ये झेप घेण्यासाठी याचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. कसे ते पाहूया,

एका पाहणी अहवालानुसार रिक्रुटर आणि एचआर विभाग मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करून नोकरभरती करत आहेत. यात फेसबुकने आघाडी घेतली आहे. तुमचे व्यावसायिक अस्तित्व मॅनेज करण्यासाठी फेसबुकचा (७४ टक्के) सर्वाधिक वापर होतो आहे. त्यानंतर लिंक्डइन (५६ टक्के) आणि इंस्टाग्रामचा (४९ टक्के) नंबर लागतो. जवळपास ६८ टक्के रिक्रुटरचे म्हणणे आहे की जॉब शोधणाऱ्यांसाठी लिंक्डइनची आवश्यकता आहे. तर ६५ टक्के रिक्रुटर लिंक्डइनचा वापर करून नोकरभरती करण्यास प्राधान्य देत आहेत.

सोशल मीडियाचा वापर कसा करावा

गुगलवर स्वत:लाचा शोधा
गुगलवर इनकॉग्निटो मोडमध्ये जाऊन स्वत:लाच सर्च करा. स्वत:चे कोणते फोटो आणि पोस्ट दिसतात ते पाहा. तुम्हाला अनावश्यक वाटणारे किंवा सर्वांनाच दिसू नयेत असे फोटो किंवा पोस्ट याठिकाणी तुम्हाला सापडत तर नाही ते तपासा. कारण रिक्रुटरनादेखील ते दिसत असतात. त्यावरूनच तुमचे इम्प्रेशन तयार होत असते. यासाठी अनावश्यक फोटो किंवा पोस्ट काढून टाका किंवा  प्राव्हयसी सेटिंगमध्ये जाऊन आवश्यक ते फेरबदल करा.


सोशल मीडिया अभ्यासासाठी


सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये काम करण्यास इच्छूक असाल त्यांची माहिती घेऊ शकता. नेमके कोणते बदल होत आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता. या तयारीमुळे तुम्हाला या कंपन्यांमधील बदलांना समजून घेण्यास मदत होते. या कंपन्यांचे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करून किंवा त्यांच्या ट्विटवर कॉमेंट करून तुम्ही त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकता. त्यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देऊ शकता. यामुळे स्पर्धेत इतरांपेक्षा तुम्ही पुढे असाल.

ठराविक सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करा


बहुतांश किंवा खूप वेगवेगळे सोशल मीडिया वापरण्याचे टाळा. खूप सोशल मीडिया अकाउंट असल्याने खूप फायदा होतो असे अजिबात नाही तर नुकसानच होऊ शकते. कारण हे सर्व अकाउंट अपडेट ठेवणे तुम्हाला शक्य होणार नाही. एक सर्वसाधारण नियम असा की जॉब सर्चसाठी फक्त एक किंवा दोनच सोशल मीडियाचा वापर करा. यात लिंक्डइन ही पहिली निवड आहे. लिंक्डइनवरील तुमची माहिती तुमच्या बायोडेटाप्रमाणे आहे की नाही ते तपासा. जे सोशल मीडिया अकाउंट तुम्हा तीन वर्षांपासून वापरले नसेल ते काढून टाका. तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये स्पष्ट करा, यामुळे तुमचे प्रोफाईल रिक्रुटरच्या सर्चमध्ये समोर येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल.

तज्ज्ञ म्हणून ओळख


जॉब शोधतानाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की इंडस्ट्रीमधील आघाडीच्या लोकांशी संपर्क वाढवणे, स्वत:ला संबंधित विषयातील तज्ज्ञ म्हणून सोशल मीडियावर प्रोजेक्ट करणे. 
यासाठी तुम्ही इंडस्ट्री स्पेसिफिक फेसबुक किंवा लिंक्डइन ग्रुपवर कॉमेंट करून शकता किंवा पोस्ट लिहू शकता. हे ग्रुप तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करू शकतात, ज्या कंपन्यांमध्ये काम करण्यास तुम्ही इच्छुक आहात त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांशी तुम्हाला जोडू शकतात. तुमच्या करियरसाठी उपयुक्त अशा पोस्ट आणि रिपोस्ट करायला सुरूवात करा. ट्विटर हेसुद्धा तुमची ओळख निर्माण करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. येथे तुम्ही तुमचे लेख देऊ शकता किंवा इंडस्ट्रीशी संबंधित बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ शकता. 

वैयक्तिक मेसेज पाठवा


लिंक्डइनवर तुमचे नेटवर्क तयार करणे हा जॉब सर्चमधील महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही एखाद्याला इन्व्हिटेशन पाठवता तेव्हा ते सर्वसामान्य स्वरुपाचे असते. तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी जोडून घ्यायचे असल्यास त्याला वैयक्तिक स्वरुपाचा मेसेज पाठवणे केव्हाही चांगले, त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. एकदा तुम्हाला प्रतिसाद मिळाला की तुम्ही फोन कॉल करू शकता. वेगवेगळ्या लोकांशी संबंध जोडणे आणि वाढवणे हे सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी आहे. 

सोशल मीडियाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू नका. स्पर्धेच्या जमान्यात सोशल मीडियाचा स्मार्ट आणि सकारात्मक वापर तुम्हाला इतरांपेक्षा नेहमी पुढे ठेवेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी