नवी दिल्ली: एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन सरकारी मालकीच्या कंपन्यांची विक्री करण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्ट महिन्यापर्यंत म्हणजेच मार्च २०२० प्रयंत या दोन्ही कंपन्यांची विक्री करण्यात येईल असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. देशातील अर्थव्यवस्थेवर सध्या आर्थिक मंदीचं सावट आहे तसेच कोट्यावधी रुपयांचं कर्ज देखील आहे आणि असे असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य आलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले की, एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांची विक्री झाल्यावर त्याचा सरकारला जवळपास एक लाख कोटी रुपयांचा फायदा होईल. एअर इंडिया विक्रीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं दिसत आहे. गेल्यावर्षी गुंतवणूकदार इतके उत्साही नव्हते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशात सध्या निर्माण झालेल्या आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी सरकारचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. देशातील बहुतांश क्षेत्र आता चांगल्या स्थितीत येत आहे. आता बरेच उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी तयारी करत आहेत.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनेचे सध्याचे बाजार भांडवल अंदाजे १.०२ लाख कोटी रुपये इतके आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील ५३.५३ टक्के भागभांडवलची विक्री केल्यास सरकारला सुमारे ६५,००० कोटी रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात एअर इंडियाला जवळपास ४६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण या कारणांमुळे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, आगामी २०१९-२० या आर्थिक वर्षात कंपनीला फायदा होईल.