ITR filing last date: आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा, आता 'ही' आहे आयटीआर भरण्याची शेवटची तारीख

ITR filling date: आयटीआर भरण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० होती. मात्र, आयकर विभागाने आता तारीख वाढवून करदात्यांना दिलासा दिला आहे.

ITR Filing Date
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई : आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख वाढवून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता आयटीआर १० जानेवारी २०२१ पर्यंत भरता येणार आहे. यापूर्वी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० होती. हा आयकर परतावा आर्थिक वर्ष २०१९-२० चं आहे.

सरकारने सांगितले की, वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर परतावा म्हणजेच आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख १० दिवसांनी वाढवली असून आता शेवटची तारीख १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर कंपन्यांसाठी आर्थिक वर्ष २०१९-२०साठीचं आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवून १५ फेब्रुवारी २०२१ करण्यात आली आहे.

कोविड-१९ मुळे नागरिकांना यंदा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळेच सरकारने आयटीआर भरण्याची तारीख आता पुन्हा एकदा वाढवली आहे. ज्या करदात्यांनी आयटीआर-१ आणि आयटीआर-४ फॉर्मचा उपयोग करुन आयटीआर फाईल करत आहेत त्यांच्या अकाऊंटचे ऑडिट करण्याची गरज नाही.

तिसऱ्यांदा वाढवली आयटीआर भरण्याची तारीख

करदात्यांना सहसा ३१ जुलैपर्यंत आयटीआर फाईल करावा लागतो मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारने आयटीआर भरण्याची तारीख वाढवली आहे. सरकारने आयटीआर भरण्याची तारीख आता तिसऱ्यांदा वाढवली आहे. यापूर्वी ३१ जुलै २०२० वरुन आयटीआर भरण्याची तारीख ३१ ऑक्टोबर २०२० करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तारीख वाढवून ३१ डिसेंबर २०२० करण्यात आली. मग आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आयटीआर भरण्याची तारीख वाढवून १० जानेवारी २०२१ अशी करण्यात आली आहे.

आयटीआर भरण्यास विलंब केल्यास (अंतिम तारखेच्या नंतर भरल्यास) दंड आकारला जाऊ शकतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांहून अधिक आहे त्यांच्याकडून हा दंड आकारला जाऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी