कोरोनाच्या नव्या व्हायरसची घेतली शेअर बाजाराने धास्ती, अवघ्या काही तासात ७ लाख कोटींचा चुराडा 

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Dec 21, 2020 | 18:24 IST

Share Market: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार पसरल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली.

SENSEX
कोरोनाच्या नव्या व्हायरसने शेअर बाजार कोसळला!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूचा शेअर बाजारावर परिणाम 
  • शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण
  • सेन्सेक्स आणि निफ्टीमधील घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान 

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (new type of corona virus) समोर आल्याने आता जगभरात त्यामुळे दहशत पसरण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम (impact) भारतीय शेअर बाजारावरही (stock market) झाला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल 1,407 अंकांची घसरण झाली आहे. तसेच ३० शेअर असणाऱ्या बीएसईचा निर्देशांक १,४०६.७३ अंकांनी म्हणजेच तब्बल ३ टक्क्यांनी घसरुन ४५,५५३.९६ अंकांवर बंद झाला आहे. तर एनएसई निफ्टी (Nifty) ४३२.१५ अंकांनी म्हणजेच ३.१४ अंकांनी घसरून १३,३२८.४० वर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जोरदार घसरणीमुळे (fall drastically) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं तब्बल ७ लाख कोटींचं नुकसान झालं आहे. 

सोमवारी दुपारनंतरील व्यवहारादरम्यान स्थानिक शेअर बाजारात खळबळ उडाली. जोरदार विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स २००० हून अधिक अंकांनी खाली आला होता. त्यामुळे सेन्सेक्स जवळजवळ ४५ हजारांच्या देखील खाली आला होता आणि निफ्टीमध्येही ६०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. युरोपियन शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारावरही त्याचा जबरदस्त परिणाम दिसून आला.

मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ३० शेअरांवरील प्रमुख सेन्सेक्स मागील सत्रच्या तुलनेत २८.५१ अंकांच्या घसरणीसह ४६,९३२.१८ अंकांवर सुरु झाला होता आणि ४४,९३२.०८ टक्क्यांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या 50 शेअरचा प्रमुख समभाग असलेला निफ्टीही १३,७४१.९० वर सुरु झाला होता आणि मागील सत्रांच्या तुलनेत १८.६५ अंकांच्या घसरणीसह १३,१३१.४५ अंकांपर्यंत त्याची घसरणा झाली. 

कोरोनाच्या नव्या व्हायरसमध्ये पुन्हा एकदा जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारामध्ये विक्रीचा जोर वाढला.

यूकेमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन म्यूटेंट स्ट्रेनमुळे उड्डाणांवर बंदी घालण्यात आल्यामुळे त्याचा शेअर बाजारावर प्रचंड दबाव जाणवत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी