Maharashtra facing shortage of 1 crore eggs per day : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. या वातावरणात अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. पण वाढती मागणी पूर्ण करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात तर दररोज 1 कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे.
सध्या महाराष्ट्रात दररोज 2 कोटी 25 लाखांपेक्षा जास्त अंड्यांची विक्री होत आहे. पण अंड्यांची मागणी पूर्ण करणे अद्याप शक्य झालेले नाही. दररोज मागणीच्या तुलनेत सुमारे 1 कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. ही माहिती महाराष्ट्राच्या पशुपालन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धनंजय पारकले यांनी दिली.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे अंड्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रातले अंड्यांचे उत्पादन वाढावे आणि मागणी पूर्ण करणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग एका योजनेवर काम करत आहे.
अंड्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंड्यांची खरेदी सुरू आहे. राज्यातील अंड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्यात 1 हजार पिंजऱ्यांसह 21 हजार रुपयांच्या सवलतीच्या दरात 50 पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्या उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे.
महाराष्ट्रातले अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी व्यापक पातळीवर योजना राबविणयाकरिता पशुसंवर्धन विभागाने एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे. शासकीय प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रात आज म्हणजेच बुधवार 18 जानेवारी 2023 रोजी 100 अंड्यांसाठी औरंगाबादमध्ये ५७५ रुपये तर मुंबईत 624 रुपये मोजावे लागत आहेत.