मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये आता आणखी एक मोठी गुंतवणूक होणार आहे. सौदी अरेबियातील पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (पीआयएफ) Public Investment Fund रिलायन्स रिटेल (Reliance Retail)मध्ये तब्बल 1.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 9,555 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह पीआयएफ ही कंपनी रिलायन्स रिटेलमधील 2.04 टक्के हिस्सा खरेदी करेल. रिलायन्स रिटेलने गुरुवारी या संदर्भातील माहिती दिली आहे.
या करारासाठी रिलायन्स रिटेलचे मूल्य 4.587 कोटी रुपये इतके ठेवण्यात आले होते. यापूर्वी पीआयएफने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करत 2.32 टक्के हिस्सा खरेदी केला होता. जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम युनिट आहे. या करारापूर्वी रिलायन्स रिटेलने जगभरातील अनेक मोठ्या गुंतवणुकदारांकडून 37,710 कोटी रुपये जमा केले आहेत. यामध्ये सिल्व्हर लेक (Silver Lake), केकेआर (KKR), जनरल अटलांटिक (General Atlantic), मुबादला (Mubadala), जीआयसी (GIC), टीपीजी (TPG) आणि एडीआयए (ADIA) यांचा समावेश आहे. या गुंतवणुकदारांनी रिलायन्स रिटेलने चार आठवड्यांपेक्षाही कमी वेळेत ही रक्कम गुंतवणूक केली आहे.
यापूर्वी सिल्व्हर लेकने रिलायन्स रिटेलमध्ये 9 सप्टेंबर रोजी गुंतवणूक केली होती. रिलायन्स रिटेलच्या वाढत्या व्यवसायामुळे देशभरात रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. यासोबतच भविष्यात रिलायन्स रिटेलचा विस्तार आणखी वाढवून रोजगार वाढविण्याचेही कंपनीचे लक्ष्य आहे.
रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी बनली आहे. रिलायन्स रिटेल देशभरात 12,000 स्टोअर्सच्या माध्यमातून रिटेल व्यवसाय करते. हा करार होण्यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 2.18 टक्क्यांनी वाढ होत 1,955.10 रुपयांवर पोहोचला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, सौदी अरेबियाच्या आर्थिक परिवर्तनात पीआयएफ ही महत्वाची कंपनी आहे. रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पीआयएफचे मी स्वागत करतो. रिलायन्स रिटेलमधील एक मौल्यवान भागीदार आणि भारतीय नागरिक, कोट्यावधी छोटे व्यापारी यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी भारताच्या रिटेल क्षेत्राचा कायापालट करण्याचा महत्वाकांक्षी प्रवास सुरू ठेवून आम्ही त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.