लस भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देईल

काम-धंदा
Updated Jan 23, 2021 | 05:42 IST

How vaccines can be a booster shot for the Indian economy लसीकरण अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे.

थोडं पण कामाचं
  • लस भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देईल
  • शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण
  • १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असलेल्या अर्थसंकल्पातून लोकांना प्रचंड आशा

नवी दिल्ली: कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता विकसित व्हावी याकरिता भारतात लसीकरण सुरू आहे. देशात १६ ते २२ जानेवारी या कालावधीत १० लाख ४३ हजार ५३४ जणांना लस देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात आता १ लाख ८८ हजार ६८८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण १.७८ टक्के एवढे आहे. याउलट कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ कोटी २ लाख ८३ हजार ७०८ झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ९६.७८ टक्के आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात १ लाख ५३ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मागील आठवड्याभरापासून दैनंदिन मृत्यू २००पेक्षा कमी आहेत. मृत्यूचे प्रमाण १.४४ टक्क्यांवर आले आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याही १४ ते १७ हजार या दरम्यान आहे. मृत्यूच्या प्रमाणात होत असलेली घसरण, कमी होत असलेले दैनंदिन रुग्ण आणि देशात सुरू असलेले लसीकरण यामुळे आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा अंत जवळ येत असल्याचे उत्साही वातावरण देशात दिसत आहे. या आनंदी वातावरणाचे सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत. लसीकरण अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. (How vaccines can be a booster shot for the Indian economy)

भारतीय शेअर बाजाराने (share market) गुरुवारी २१ जानेवारी रोजी ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता. सध्या बीएसई इंडेक्समध्ये ४८ ते ५० हजार दरम्यान चढउतार सुरू आहेत. स्थापनेच्या ४३ वर्षांनंतर बेंचमार्कने १५.५ टक्के वार्षिक रिटर्न दिले. माहिती तंत्रज्ञान (आयटी), ऊर्जा, वाहन कंपन्या, सरकारी बँका आणि औषध व लस क्षेत्रात कार्यरत कंपन्या यांचे शेअर तेजीत आहेत. 

शेअर बाजारात चढउतार सुरू असतात. पण या निमित्ताने भारतीय बाजारपेठ मोठ्या गुंतवणुकीसाठी सक्षम असल्याचा संदेश सर्वत्र जात आहे. थेट परकीय गुंतवणूक (Foreign Direct Investment - FDI) वाढत आहे. देशातील रोजगार निर्मिती पुढील काही महिन्यात वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

मायकेल पेज टॅलेंट ट्रेंड २०२१ नुसार बहुतेक कंपन्या या वर्षी वेतनात वाढ करणार आहेत. काही कंपन्यांनी वेतनवाढ आणि बोनस जाहीर केला आहे. मात्र अद्याप ६० टक्के कंपन्यांचे या संदर्भातले निर्णय जाहीर व्हायचे आहेत. या कंपन्या पुढील तीन-चार महिन्यांत वेतनवाढ आणि बोनस जाहीर करण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी), ऊर्जा, वाहन कंपन्या, औषध व लस क्षेत्रातील कंपन्या तसेच सेवा क्षेत्रातील असंख्य कंपन्या या वर्षी पुन्हा एकदा कर्मचारी भरती करतील. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे वेतन वाढले नाही तरी त्यांना इंटरनेट भत्ता, मोबाइल भत्ता या स्वरुपात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा अर्थसंकल्प (बजेट) १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून अनेकांना खूप आशा आहे. लोकांच्या अपेक्षांपैकी जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. 

इटी नाऊचे सल्लागार संपादक स्वामीनाथन अय्यर (Swaminathan Aiyar, Consulting Editor, ET NOW), बंधन बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि संशोधन प्रमुख सिद्धार्थ सान्याल (Siddhartha Sanyal, Chief Economist & Head Research, Bandhan Bank) आणि सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकोनॉमिक्स अँड पॉलिसीचे संचालक डॉक्टर रमण लक्ष्मीनारायण (Dr. Ramanan Laxminarayan, Director of the Center for Disease Dynamics, Economics & Policy) यांच्या मते सकारात्मक घटना घडत आहे. या सगळ्याचे चांगले परिणाम दिसून येतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. कोरोनामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था उसळी मारुन पुन्हा वर येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी