आदित्य ठाकरेंवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली!

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 28, 2019 | 20:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nilesh Rane vs Aaditya Thackeray: युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याबाबत एकीकडे चर्चा सुरू झालेली असताना दुसरीकडे निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

nilesh rane_twitter
आदित्य ठाकरेंवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली!  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली असताना दुसरीकडे नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिंरजीव निलेश राणे यांची याचविषयी आदित्य ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबातील वैर हे सगळ्यांनाच माहित आहे. राणे कुटुंबाकडून शिवेसना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. आता निलेश राणेंनी यावेळी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली आहे. पण टीका करताना निलेश राणे यांचा तोल काहीसा ढासळला आहे. निलेश राणे यांनी ट्विटरवरून आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

'निवडणूक लढवायला हिम्मत लागते... विजय किव्हा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे हिजड्यांसारखे फक्त तिकिट वाटप करू शकतात.' अशी टीका निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. 

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी

युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी काल (सोमवार) आपल्या इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरेंसोबतचा एक फोटो शेअर करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रियाही आल्या. खासकरून शिवसेनेच्या गोट्यातून अनेक प्रतिक्रिया यावेळी आल्या. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी असंच अनेकांचं म्हणणं आहे.  त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याबाबत शिवसेना गंभीरपणे विचार करत असल्याचं समजतं आहे. अशाच वेळी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना एक प्रकारे आव्हान देखील दिलं आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे निवडणूक लढवतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. आदित्य यांनी वरळी किंवा शिवडी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं काहीचं मत आहे. तर शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या मते आदित्य यांनी विधानसभा निवडणूक ही ग्रामीण भागातून लढवावी जेणेकरून शिवसेनेला त्याचा आणखी फायदा होईल. मात्र, सध्या या फक्त चर्चा सुरू आहेत. याबाबत कोणतीही ठोस भूमिका शिवसेनेकडून घेतली गेल्याचं अद्याप तरी दिसून आलेलं नाही. त्यामुळेच निलेश राणेंनी देखील आदित्य ठाकरेंना थेट निवडणुकीचं आव्हान दिलं आहे. 

राणेंना कोकणात मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश राणेंनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली होती. किंबहुना संपूर्ण निवडणुकीत शिवसेनाच त्यांच्या टार्गेटवर होती. पण तरीही कोकणातील मतदाराने शिवसेनेच्याच विनायक राऊतांवर भरवसा दाखवत निलेश राणेंना पुन्हा एकदा पराभूत केलं. राणे कुटुंबीयांसाठी हा पराभव मोठा मानला जात आहे. कारण या निवडणुकीतील निकालावर राणेंची कोकणातील अनेक राजकीय गणितं अवलंबून होती. त्यामुळे आता विधानसभेसाठी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना वेगळी रणनीति आखण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी