[VIDEO]: अहमदनगरमध्ये भाजपाला धक्का, भाजप नेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 23, 2019 | 21:14 IST | ऊमेर सय्यद

BJP leader join NCP: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपत प्रवेश करत असतानाच आता चक्क भाजपच्याच नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अहमदनगरमध्ये भाजप नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

ahmednagar akole bjp leader join ncp ashok bhangare ajit pawar maharashtra assembly election 2019
[VIDEO]: अहमदनगरमध्ये भाजपाला धक्का, भाजप नेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ 

थोडं पण कामाचं

  • अहमदनगरमध्ये भाजपाला धक्का
  • भाजपचे अशोक भांगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
  • अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
  • भ्रष्ट नेत्यांना भाजपत प्रवेश दिल्याने भांगरे नाराज

अहमदनगर: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते भाजपत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केला. मात्र, पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी आता राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती बांधलं आहे. भाजपच्या अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी समृद्धी महामार्गावर केलेल्या जमीन घोटाळ्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देवून ही मुख्यमंत्र्यांनी पिचड पिता-पुत्रांना भाजपात प्रवेश दिला. त्यांना उमेदवारी देण्याचे ठरविल्याणे मी माझ्या कार्यकर्त्यासोबत भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला अशी प्रतिक्रिया अशोक भांगरे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि सध्याचे भाजपा नेते असलेले मधुकर पिचड यांनी आदिवासी समाजाच्या बोगस प्रमाणपत्रावर समृद्धी महामार्गावरील जमीन बळकावून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. या सर्वांचे पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांना देवून देखील त्यांनी पिचड पिता-पुत्रांना भाजपत प्रवेश देवून विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.  विषेश म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिकपणे काम करून देखील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपत प्रवेश देत असल्याने आम्ही भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणणार अशी प्रतिक्रिया अशोक भांगरे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत नेते आणि शरद पवार यांची सहकारी मानले जाणारे माजी मंत्री मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत काही दिवसांपूर्वीच भाजपत प्रवेश केला. पिचड पिता पुत्रांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर पिचड यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीला कडाडून विरोध प्रदर्शनही करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे झालेल्या सभेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी पिचड यांना एकवेळ निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. यानंतर पिचड पिता पूत्रावर नाराज झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्तीने मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेक देखील केली होती.

कोण आहेत अशोक भांगरे?

अशोक भांगरे हे भाजपचे जेष्ठ आणि कट्टर नेते मानले जात. भांगरे यांनी पक्ष सोडल्याने भाजपाला अकोलेमध्ये मोठा धक्का बसला आहे. अशोक भांगरे हे अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते. अकोले तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्यासोबत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पिचड यांच्या विरोधात भाजपाकडूनच भांगरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते, थोड्या मतांनी भांगरे यांचा पराभव झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी