नगरमध्ये EVM फोडण्याचा प्रयत्न, मशीन फोडणारे चौभे पोलिसांच्या ताब्यात

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 21:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणूक २०१९ चं तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालंय. मात्र निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत एकानं चक्क ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

Jalindar Choubhe
ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न 

अहमदनगर : निवडणूक आयोगानं या लोकसभा निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी अनेकदा आपण ऐकतो. मात्र अहमदनगरच्या एका व्यक्तीनं बॅलेट पेपर हवेत ईव्हीएम नको म्हणत चक्क ईव्हीएमच फोडण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी इथं जालिंदर चौभे या व्यक्तीनं ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी गावात जालिंदर चौभे हे सामाजिक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ईव्हीएमवर बंदी आणून बॅलेट पेपरलर निवडणुका घेण्याची मागणी चौभे यांची आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तसं निवेदनही केलं होतं. ईव्हीएम मशीन वापरणं टाळावं यासाठी चौभे यांनी यापूर्वी आंदोलन ही केले आहेत.

मात्र जालिंदर चौभे यांच्या ईव्हीएम मशीन बंद पाडण्याच्या मागणीला निवडणूक आयोगाकडून उत्तर न मिळाल्यानं त्यांनी आज ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला. बाबुर्डी गावातील मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेलेले असता ते आपल्यासोबत एक लोखंडी पट्टी घेऊन गेले होते. मतदान करण्यासाठी आत खोलीत आल्यानंतर हातावर शाई लावली आणि मशीनकडे मत टाकायला गेले. तिथं पोहोचताच त्यांनी आपल्या खिशातील लोखंडी पट्टी काढली आणि ईव्हीएम फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

बाबुर्डी गावातील मतदान केंद्र प्रमुख नितीन वाळुंज यांनी पोलिसांना ही माहिती दिली. ईव्हीएम सोबत जालिंदर चौभे यांनी छेडछाड केल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी चौभे यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

यापूर्वी ही अशीच घटना घडली होती. पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी आंध्रप्रदेशमधील एका उमेदवाराने थेट ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं होतं. मतदानाच्या दिवशीच उमेदवारानं केलेलं हे कृत्य कॅमेऱ्यातही कैद झालं होतं.

आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील जनसेना पक्षाचे आमदार आणि लोकसभेचे उमेदवार मधुसूदन गुप्ता हे ईव्हीएममधील बिघाडाला एवढे वैतागले की, त्यांनी थेट ईव्हीएम मशीनच जमिनीवर आपटून फोडलं. यावेळी गुप्ता हे फारच भडकले होते. त्यांनी केलेलं हे संपूर्ण कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे आमदार गुप्ता हे खूपच नाराज झाले होते. दरम्यान, या प्रकरणानंतर गुप्ता यांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती.
 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
नगरमध्ये EVM फोडण्याचा प्रयत्न, मशीन फोडणारे चौभे पोलिसांच्या ताब्यात Description: लोकसभा निवडणूक २०१९ चं तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालंय. मात्र निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत एकानं चक्क ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला.
Loading...
Loading...
Loading...