अहमदनगरमध्ये अस्तित्वाची लढाई, कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 19:33 IST | ऊमेर सय्यद

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर. या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Sangram jagtap and sujay vikhe
अहमदनगरमध्ये अस्तित्वाची लढाई, कोण मारणार बाजी?  |  फोटो सौजन्य: Twitter

अहमदनगर: महाराष्ट्रात लोकसभेची लक्षवेधी जागा म्हणून अहमदनगर मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. त्यामुळेच तिसऱ्या टप्यात होणाऱ्या निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. गेले महिनाभर येथे प्रचार सुरू होता. अखेर काल (रविवार) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. अहमदनगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संग्राम जगताप यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षातर्फे सुजय विखे-पाटील अशी थेट लढत होणार आहे.  

सुजय विखे-पाटील हे कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव आहेत. सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघात कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवायची होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेली अहमदनगरची जागा कॉंग्रेसला देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्याने सुजय विखे-पाटील यांनी ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश करुन थेट उमेदवारी मिळवली.  

सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. लोकसभेची ही निवडणूक १९९१ ची पुनरावृत्ती करेल अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी सुजय विखे यांचे आजोबा आणि दिवंगत नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. पवारांच्या या टीकेनंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की, 'शरद पवार यांनी केलेल्या या टीकेमुळे मी अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करणार नाही.' 

दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटलांच्या या भूमिकेनंतर पवार विरुद्ध विखे असा संघर्ष अहमदनगरमध्ये पाहायला मिळतो आहे. पवार-विखे आरोप प्रत्यारोपानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून राष्ट्रवादीचेच विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेची उमेदवारी देऊ केली. संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आणि सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर पवार आणि विखे या दोन्ही घराण्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. 

राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना निवडून देण्यासाठी शरद पवारांनी अहमदनगर मतदारसंघामध्ये तब्बल ५ जाहीर सभा घेतल्या. तर सुजय विखेंनी देखील थेट पंतप्रधान मोदी यांचीच सभा भरवली. दोन्ही पक्षाकडून अद्यापही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर देखील वैयक्तिक टीका सुरूच आहे. आता या दोन्ही घराण्यांनी आपले अस्तित्व पणाला लावले असून २३ एप्रिलला सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून त्याच दिवशी नेमकं कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अहमदनगरमध्ये अस्तित्वाची लढाई, कोण मारणार बाजी? Description: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर. या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Loading...
Loading...
Loading...