पक्षात गुंडगिरी करणाऱ्यास जशास तसे उत्तर देणार - माजी महापौर अभिषेक कळमकर

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 24, 2019 | 14:07 IST | ऊमेर सय्यद

विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. या निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर येऊ लागले आहेत.

ahmednagar ncp ex mayor abhishek kalamkar clash two group maharashtra assembly election 2019
पक्षात गुंडगिरी करणाऱ्यास जशास तसे उत्तर देणार - माजी महापौर अभिषेक कळमकर  

थोडं पण कामाचं

  • निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत दुफळी
  • शरद पवारांच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी
  • ऐन निवडणुकीत पक्षातील मतभेद चव्हाट्यावर

अहमदनगर: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये दुफळी तयार झाली आहे. पक्षात गुंडगिरी करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

२१ सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा पार पडली. ही सभा संपताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या समोरच माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. धक्काबुक्की झाल्याने अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. 

मात्र स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांनी दोन्ही गटातील नेते, कार्यकर्त्यांची समजूत काढल्याने माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तक्रार न देत या वादावर पडदा टाकला होता. मात्र आता अभिषेक कळमकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यासमोरच काही कार्यकर्त्यांनी केलेली गुंडगिरी ही नेहमीचीच बाब झाली आहे. यापुढे शहरात दहशत माजवण्याचा प्रकार केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल अशी प्रतिक्रया माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दुफळी या प्रकारानंतर स्पष्ट झाली आहे. एकीकडे पक्ष सोडणाऱ्या नेत्यामुळे पक्षाला झळ बसत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी देण्यासाठी स्वतः शरद पवार हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. असे असताना महाराष्ट्रतील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरातच ऐन निवडणुकीत पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीवर या वादाचा परिणाम होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी