अमेठीत रक्तरंजित राजकारण,  हत्येप्रकरणी  ३ जण अटकेत २ फरार

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 27, 2019 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागला आणि अमेठीत रक्तरंजित राजकारण पाहायला मिळालं. अमेठीत भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 

Amethi Murder Case
अमेठीत रक्तरंजित राजकारण,  हत्येप्रकरणी  ३ जण अटकेत २ फरार  |  फोटो सौजन्य: Twitter

अमेठीः लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागताच अमेठीत रक्तरंजित राजकारण पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुरेंद्र सिंग हे अमेठीतील भाजपच्या नवविर्वाचित खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय होते. या हत्येप्रकरणी आता पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. तसंच ज्या शस्त्रानं त्यांची हत्या करण्यात आली ते हत्यार देखील पोलिसांनी हस्तगत केलं आहे. तर या हत्येप्रकरणातील २ आरोपी अद्याप ही फरार आहेत. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनी म्हटलं की, रामचंद्र नावाच्या मुख्य आरोपीला पकडण्यात आलं आहे. त्याच्याकडून 315 बोर कंट्री मेड पिस्तूल जप्त केली आहे. त्यासोबतच त्याच्याकडून एक रक्तानं माखलेला टॉवेल जप्त केला आहे. तिघांना आता तुरूंगात पाठवलं असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपी अतुल सिंग आणि वसीम अजूनही फरार आहे. मात्र आमची ४ टीम यांचा शोध घेत आहेत. 

काल  सुरेंद्र सिंग यांच्या गोळ्या झाडून हत्या केली गेली. सुरेंद्र यांना उपचारासाठी लखनऊतील ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अप्पर पोलीस अधिक्षक दया राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरौलिया गावाचे माजी प्रधान सुरेंद्र सिंह यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना उपचारासाठी लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान आज डीजीपी यांनी सांगितलं की, सर्व पुराव्यांच्या आधारावर हे स्पष्ट होतं की या पाच आरोपींची आणि सुरेंद्र सिंग यांची स्थानिक पातळीवरच्या राजकारणात वादविवाद होते. सुरेंद्र सिंग यांना आरोपींनी रविवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गोळी मारली जेव्हा ते आपल्या घरी झोपले होते. त्यांना लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. 

सुरूवातीला आलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ५ लोकांविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. त्यापैकी ३ आरोपींना पकडण्यात आलं आहे. तर २ आरोपी फरार आहेत. माजी प्रधान सुरेंद्र सिंग यांच्या मुलानं म्हटलं की, माझे वडिल भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या जवळचे होते. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्विकारली होती. विजयानंतर एक रॅली काढण्यात आली होती. हीच गोष्ट काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना पचली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची हत्या केली. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान सुरेंद्र सिंग हे खूपच चर्चेत होते. सुरेंद्र हे स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी स्मृती इराणी यांच्यावर बरौलिया गावातील लोकांना शूज वाटण्याचा आरोप करत हा अमेठीतील नागरिकांचा अपमान असल्याचं म्हटलं होतं. बरौलिया गावाला माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतलं होतं. दरम्यान काल स्मृती इराणी यांनी सुरेंद्र यांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमेठीत रक्तरंजित राजकारण,  हत्येप्रकरणी  ३ जण अटकेत २ फरार Description: लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागला आणि अमेठीत रक्तरंजित राजकारण पाहायला मिळालं. अमेठीत भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles